'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे दिसणार 'अबब विठोबा बोलू लागला' बालनाट्यात, साकारणार धम्माल पुजारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:33 IST2025-11-20T17:33:08+5:302025-11-20T17:33:45+5:30
Ababa Vithoba Bolu Lagala Marathi Play : ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे जुनं गाजलेलं बालनाट्य पुन्हा रंगभूमीवर धमाल करण्यासाठी सज्ज झालं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे दिसणार 'अबब विठोबा बोलू लागला' बालनाट्यात, साकारणार धम्माल पुजारी
गेल्या वर्षभरात विविध विषयांवर अनेक मराठी नाटक रंगभूमीवर आली आहेत. नवीन नाटकांसोबतच जुनी गाजलेली काही नाटक रंगभूमीवर पुन्हा अवतरली. या नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. यामध्ये बालरंगभूमीसुद्धा मागे नाहीत. वेगवेगळ्या विषयांच्या बालनाट्यांनी प्रेक्षकांची मने जिंकलेली असताना आता ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे जुनं गाजलेलं बालनाट्य रंगभूमीवर पुन्हा धमाल करायला सज्ज झालं आहे. मालिका-चित्रपट दिग्दर्शक प्रशांत गिरकर हे ‘अबब विठोबा बोलू लागला’ या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून या नाटकाचे पोस्टर अनावरण प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर व ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना व पालकांना आपल्या संस्कार व संस्कृतीचे विनोदी अंगाने दर्शन देणारे हे नाटक डिसेंबर महिन्यात रंगभूमीवर येत आहे.
२ ऑगस्ट १९५९ रोजी स्थापन झालेली भारतातील पहिली बालनाट्य संस्था म्हणजेच सुधाताई करमरकर यांनी स्थापन केलेली ‘लिटिल थिएटर अर्थात बालरंगभूमी, नीळकंठ नांदुरकर लिखित ‘अबब विठोबा बोलू लागला’ हे धम्माल विनोदी नाटक नव्या संचात रंगभूंमीवर लवकरच घेऊन येत आहे. पूर्वी या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे, विजय केंकरे,विनोद हडप अशा दिग्गजांनी काम केले आहे. हे नाटक त्यांनी त्याकाळी खूप गाजवले.
आता सुधाताईंच्या पश्चात निर्माती नमिता वागळे-गिरकर हे नाटक पुन्हा घेऊन येत आहेत. या नाटकात प्रसिद्ध अभिनेते प्रभाकर मोरे धम्माल पुजारी साकारणार आहेत. त्यांच्यासोबत नीता दोंदे, सागर पवार, प्रकाश अय्याळ तसेच बालकलाकार आयुष टेंबे, किनारा पाटील, गोजिरी जगदाळे या कलाकारांच्या भूमिका आहेत.