आजकाल आम्ही कुणाच्या भावना दुखवायलाच जात नाही...; 'हास्यजत्रा'फेम सचिन गोस्वामी - सचिन मोंटेंची 'बॅटिंग', राजकारण्यांना कोपरखळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:08 IST2026-03-26T14:54:25+5:302026-03-26T16:08:05+5:30
"भावना तीव्र झाल्यातच, पण या तीव्र भावना पोहोचवण्याचं माध्यमही मिळालंय. ते म्हणजे सोशल मीडिया. पूर्वी कुणी काही सादर केलं, त्यावर काही आक्षेप असेल तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काही माध्यम नव्हतं. आज ते खूप सोपं झालंय."

आजकाल आम्ही कुणाच्या भावना दुखवायलाच जात नाही...; 'हास्यजत्रा'फेम सचिन गोस्वामी - सचिन मोंटेंची 'बॅटिंग', राजकारण्यांना कोपरखळी
एखादा समाज किती निरोगी आहे, हे मोजण्याचं परिमाण म्हणजे विनोद. जो समाज विनोदाला खूप आत्मियतेने स्वीकारतो, तो बऱ्यापैकी निरोगी असतो. आज समाजाच्या भावना थोड्या तीव्र झाल्यात. तो सेन्सेटिव्ह झालाय. कुठलीही गोष्ट करताना, यावर प्रतिक्रिया काय उमटेल, हा विचार आधी करावा लागतो. हे थोडं विनोदाला संकुचित करत जाणं होतंय. त्यामुळे आज-काल आम्ही कुणाच्या भावना दुखवायलाच जात नाही. स्वतःच्याच भावना दुखावून घतो, स्वतःवरच विनोद करतो, स्वतःवरच हसतो. अन्यथा खूप टीका होते, अशी मार्मिक टिप्पणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम लोकप्रिय लेखक-दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी व्यक्त केली.
राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांना विनंती आहे की, विनोदाचा प्रांत आमच्याकडेच ठेवा. आम्हीही हास्यजत्रा करतो, असं नेतेमंडळी म्हणत असतात. रोज इतक्या प्रमाणात विनोद झाला, तर तो आम्हाला करणं अवघड होईल, अशी कोपरखळी या जोडगोळीनं मारली, तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.
यंदाचा 'लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा' मंगळवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. राजहंस प्रकाशनाचे प्रमुख दिलीप माजगावकर यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं.लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार कुमार केतकर, अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह कला, साहित्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. साहित्य, वाचन संस्कृती, मराठी भाषा या विषयांवर दोघांनीही आपले विचार मांडले. वाचनाची गोडी कशी लागली आणि आजवरच्या कारकिर्दीत कशी उपयुक्त ठरली, वाचनामुळेच नवे विषय, नव्या कल्पना कशा सुचल्या हे दोघांनी सांगितले. अगदी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हे नावही वाचनाच्या छंदातूनच सुचल्याचं सचिन मोटे यांनी सांगितलं. लहानपणी 'रविवारची जत्रा' वाचायला खूप आवडायचं. 'कॉमेडीची बुलेट ट्रेन'मध्ये बुधवारी स्पेशल एपिसोड करायचो. तेव्हा त्याचं नाव 'बुधवारची जत्रा' ठेवूया असं डोक्यात आलं. त्यानंतर आता सोनी मराठीसाठी शो करायचा ठरलं, तेव्हा'हास्यजत्रा' करूया म्हटलं. त्याचं अजय भाळवणकरांनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' केलं, असा किस्सा त्यांनी सांगितला.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'साठी प्रहसनं कशी लिहिली जातात, निखळ विनोद करणं, दर्जा टिकवून ठेवणं, हे कसं साध्य झालं, याबद्दल मोटे-गोस्वामी बोलत असतानाच, मुलाखतकार मकरंद अनासपुरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा छेडला. वाचकांच्या- प्रेक्षकांच्या - किंबहुना एकूणच समाजाच्या तीव्र झालेल्या भावना आणि त्यातून होणारी टीका - ट्रोलिंग. त्यावर दोघांनीही मनातली खंतही बोलून दाखवली आणि हळूच चिमटाही काढला.
सचिन गोस्वामी म्हणाले, "भावना तीव्र झाल्यातच, पण या तीव्र भावना पोहोचवण्याचं माध्यमही मिळालंय. ते म्हणजे सोशल मीडिया. पूर्वी कुणी काही सादर केलं, त्यावर काही आक्षेप असेल तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काही माध्यम नव्हतं. आज ते खूप सोपं झालंय. पटकन एफबीवर - इन्स्टावर टाकता येतं. काही ग्रूप बनवता येतात समविचारींचे. पूर्वी भावना दुखावत असतील कदाचित, पण मंडळी विस्कळीत होती. आज समाज सेन्सिटिव्ह झाला आहेच. त्यात विनोदाविषयीची जी सजगता आहे, ती हळूहळू कमी होत चाललीय की काय असं वाटतं. विनोद हा समाज किती निरोगी आहे हे मोजण्याचं परिमाण आहे असं मला वाटतं. जो समाज विनोदाला खूप आत्मियतेने स्वीकारतो, तो बऱ्यापैकी निरोगी असतो. हल्ली ज्या पद्धतीने रिॲक्शन येतात, त्या पाहता विचार करून समाजापुढे जावं लागतंय. हे थोडं विनोदाला संकुचित करत जाणं होतंय."
सख्याची भीती निर्माण झाली!
पूर्वी लोकनाट्यात कृष्ण हा आमचा सखा होता. ज्याची गवळणींकडून चेष्टाही केली जायची. पण त्यावेळचा समाज विनोदाच्या बाबतीत इतका सजग होता, इतका शिक्षित होता की त्याला कृष्णाची केलेली चेष्टा आणि नंतर कृष्णाने दिलेला संदेश यात फरक करता यायचा. आता त्या सख्याची भीती निर्माण झाली. मित्रावर बोलताना घाबरायला लागलो आणि लोककलेतील प्रबोधन करणारा एक बाज हळूहळू संपत आला. भावनेच्या उद्रेकामुळे प्रबोधन थांबलं. यावर समाजाने विचार करायची गरज आहे, असं मत गोस्वामी यांनी मांडलं.
"आम्ही स्वतःवरच विनोद करतो!"
हाच मुद्दा पुढे नेत सचिन मोटे म्हणाले, "हल्ली आम्ही कुणाच्या भावना दुखवायलाच जात नाही. आमच्याकडे MHJ पोलीस आहेत, MHJ न्यायालय आहे, एमएचजोबा नावाचा देव आहे. अगदी आडनावंही आम्ही तयार करून वापरतो. कुणाच्या भावना दुखावण्यापेक्षा स्वतःच्या भावना दुखावून घेतो. आम्ही स्वतःवरच एवढे विनोद करतो की आपणच आपल्यावर हसूया. कदाचित आपण आपल्यावर हसत असताना समोरच्या समाजाला वाटेल की आपल्या मनातही हेच आहे. सुधारलं पाहिजे. अन्यथा खूप टीका होते. आम्ही दोघं पडद्यामागे असतो, पण कलाकारांना फेसबुकवर, इन्स्टावर कमेंट केल्या जातात, त्यांच्यावर टीका केली जाते. एकूण समाजच थोडा भित्रा झालाय. तो लगेच चिडतो सगळ्यावर!"
हल्ली बऱ्याच नेत्यांच्या भाषणात हास्यजत्रेचं नाव येतं. आमच्या हास्यजत्रेतही यांचं (नेत्यांचं) नाव घ्यायची संधी द्या, अशी मिष्किल टिप्पणी सचिनद्वयीनं केली. राजकीय विनोद हा एक बाज आहे. मोकळेपणानं विनोद स्वीकारण्याची महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची परंपरा आहे. आजच्या नेत्यांनीही राजकीय विनोदाला कधी आक्षेप घेतलेला नाही, पण कार्यकर्ते थोडे जास्त संवेदनशील झालेत, असं निरीक्षण या दोघांनी नोंदवलं.