Lokmat DIA: आहे परी, तर डोन्ट वरी! क्युट मायरा बेस्ट किड इन्फ्लूअन्सर पुरस्काराची मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 15:27 IST2021-12-02T15:27:09+5:302021-12-02T15:27:46+5:30
Lokmat Digital influencer Awards 2021: आपल्या उत्कृष्ट अभिनयानं अल्पावधीत लोकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या मायराचा सन्मान

Lokmat DIA: आहे परी, तर डोन्ट वरी! क्युट मायरा बेस्ट किड इन्फ्लूअन्सर पुरस्काराची मानकरी
माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या परीनं म्हणजेच मायरा वायकुळनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसोबत काम करत असलेल्या मायरानं तिच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. श्रेयसला कमावतो किती विचारणारी परी सोशल मीडियावरदेखील तितकीच ऍक्टिव्ह आहे. तिच्या व्हिडीओंना लाखो लोकांची पसंती मिळते. आहे परी, तर डोन्ट वरी म्हणणाऱ्या मायराला आज लोकमत इन्फ्लूअन्सर अवॉर्ड्स सोहळ्यात बेस्ट किड इन्फ्लूअन्सर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
सोशल मीडियावर मायराच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. तिचे फोटोज, व्हिडीओज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. परीचे डान्स, तिचे भन्नाट डायलॉग, इतकंच काय तिच्या सुंदर कपड्यांचीदेखील चर्चा होते. युट्युबवर Myra’s corner नावानं मायराचं चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत २.५७ लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या या चॅनलवर तिचे अनेक व्हिडीओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या २.८५ लाख इतकी आहे.
माझी तुझी रेशीमगाठचा प्रोमो आल्यापासून सोशल मीडियावर मायराची चर्चा सुरू झाली. त्या प्रोमोमध्ये मायरा अभिनेता श्रेयस तळपदेसोबत लग्नाची बोलणी करताना दिसली. मालिकेनं अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यात मायराचा मोठा वाटा आहे. क्युट मायरासाठी मालिका पाहणाऱ्या, अपने पास बहुत पैसा म्हणणाऱ्या परीच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.