साथ सात जन्माची! अभिनेता मेघन जाधव अडकला लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 21:21 IST2025-11-16T21:19:58+5:302025-11-16T21:21:31+5:30
सेटवर फुललेल्या लव्हस्टोरीचं आज 'हॅपिली एव्हर आफ्टर'

साथ सात जन्माची! अभिनेता मेघन जाधव अडकला लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार यंदा लग्नबंधनात अडकले. आपल्या जोडीदारासोबत लग्नगाठ बांधून त्यांनी नव्या प्रवासाला सुरूवात केली. 'लक्ष्मी निवास' मालिकेतील जयंत म्हणजेच लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव हा आज १६ नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे. त्याने अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरसोबत सप्तपदी घेतल्या. मेघन आणि अनुष्का आता आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत. या दोघांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. या दोघांवर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
मेघन आणि अनुष्का यांच्या लग्नाच्या फोटोंमध्ये त्यांच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. दोघांनीही आपल्या खास दिवसासाठी पारंपरिक आणि अत्यंत आकर्षक लूक निवडला होता. अनुष्काने लग्नासाठी खास गुलाबी रंगाची साडी निवडली होती. या सुंदर साडीवर तिने खास मराठमोळा साज केला होता. नथ, ठुशी, बांगड्या आणि कपाळावर टिकली अशी पारंपरिक वेषभूषा तिने केली होती. ज्यामुळे तिचा नववधूचा लूक एकदम 'रॉयल' आणि पारंपरिक दिसत होता.नवरदेव मेघन यानेही अनुष्काच्या लूकला साजेसा असा पेहराव केला होता. मेघनने पांढराशुभ्र कुर्ता परिधान केला होता. या कुर्त्यावर त्याने अनुष्काच्या साडीच्या रंगाशी मिळताजुळता गुलाबी रंगाचा शेला घेतला होता. मेघन आणि अनुष्काच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली. ज्यात हर्षदा खानविलकर, रेश्मा शिंदे, आशुतोष गोखले यांचा समावेश होता.
'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या सेटवर भेट
मेघन आणि अनुष्का गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आज ते लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघांची भेट 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या सेटवर झाली होती. सेटवर त्यांची छान मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं, हे त्यांनाही कळलं नाही. अखेर दोघांनीही आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगितलं आणि आज त्यांनी लग्न करून नव्या इनिंगला सुरूवात केली आहे.
या सेलिब्रिटी कपलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते एकमेकांना प्रेमाने टोपण नावाने हाक मारतात. मेघन आणि अनुष्का एकमेकांना 'बेंगू' आणि 'बेंगी' या खास नावाने हाक मारतात. कामाबद्दल बोलायचं झाल्यास, मेघन जाधव सध्या 'लक्ष्मी निवास' या लोकप्रिय मालिकेत 'जयंत'ची भूमिका साकारत आहे. तर अनुष्का पिंपुटकर सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत काम करत आहे. हे दोघे फक्त पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही एकमेकांना नेहमी पाठिंबा देताना दिसतात. या दोघांनी एकत्र येऊन एक बिझनेससुद्धा सुरू केला आहे.