अवघ्या ८ महिन्यात मालिका संपली! मुख्य अभिनेता झाला भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाला-"हा प्रवास..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:05 IST2026-01-05T14:02:05+5:302026-01-05T14:05:44+5:30
"हा प्रवास...", 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिका संपताच अभिनेता भावुक, शेअर केली पोस्ट

अवघ्या ८ महिन्यात मालिका संपली! मुख्य अभिनेता झाला भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाला-"हा प्रवास..."
Mandar Jadhav Post: स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळते आहे. नव्याने सुरु होणार्या या मालिकांमुळे साहजिकच जुन्या मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार आहे.'मी सावित्रीबाई फुले' आणि 'तुझ्या सोबतीने' या दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामुळे कोणती मालिका बंद होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं होतं. हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. आठ महिन्यापूर्वी प्रसारित झालेली 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका आता बंद झाली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.या मालिकेच्या निमित्ताने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम गिरीजा-मंदारची जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकली होती. आता या मालिकेचा सुंदर शेवट होऊन ही मालिका ऑफ एअर झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड नाराज झाले आहेत. ही मालिका संपताच गिरीजा प्रभूने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर आता अभिनेता मंदार जाधवनेही सोशल मीडियावर भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलंय, कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल आणि प्रत्येक क्षणी माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुमच्या प्रेमाने, विश्वासाने आणि पाठिंब्याने हा प्रवास अविस्मरणीय झाला. तुमचं हे प्रेम माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहील. असाच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम या पुढेही कायम राहू दे...", अशा आशयाची पोस्ट मंदारने लिहिली आहे.
दरम्यान, अभिनेत्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत." यश कावेरीचा प्रवास अजून हवा होता..."," हे फोटोस आठवणी बघुन प्रत्येक वेळी मन भरून येतं....हेच तुमच्या कामाची पावती आहे." अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत.