कोण आहे अर्जुन भल्ला? होणार आहे स्मृती इराणींच्या घरचा जावई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 14:34 IST2021-12-27T14:33:14+5:302021-12-27T14:34:13+5:30
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या Smriti Irani आता खऱ्या आयुष्यात सासूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्मृती यांनी स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

कोण आहे अर्जुन भल्ला? होणार आहे स्मृती इराणींच्या घरचा जावई
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांची कन्या शेनेल इराणीचा (Shanelle Irani) साखरपुडा नुकताच पार पडला. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत सुनेची भूमिका साकारणाऱ्या स्मृती आता खऱ्या आयुष्यात सासूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. स्मृती यांनी स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. सोबत मुलगी शेनेल आणि होणारा जावई अर्जुन भल्लाचा साखरपुड्याचा एक सुंदर फोटोही शेअर केला होता. (Smriti Irani Would Be Son In Law Arjun Bhalla )
हा फोटो तुम्ही पाहिला असेलच. पण स्मृतींचा हा होणारा जावई कोण आहे, काय करतो हे जाणून घेण्यास सगळेच उत्सुक आहेत.
तुम्हाला कदाचित माहित नसेल पण शेनेल ही स्मृती इराणी यांची सावत्र मुलगी आहे. ती स्मृती यांचे पती जुबिन यांच्या पहिली पत्नी मोना इराणी यांची लेक आहे. शेनेल स्वत: वकील आहे. तर तिचा होणारा पती अर्जुन भल्ला हा सध्या लंडनमध्ये एमबीए करतोय. राजकीय कुटुंबाशी त्याचा काहीही संबंध नाही.
अर्जुन हा टोरंटो कॅनडाचा राहणारा आहे. कॅनडातच त्याचा जन्म झाला. कॅनडाच्या सेंट रॉबर्ट कॅथलिक हायस्कूलमधून त्याचे शालेय शिक्षण झालं. यानंतर University of Leicester मधून त्यानं एलएलबी केलं. 2014 मध्ये त्याने कॅनडातच अकाऊंट मॅनेजर म्हणून नोकरी सुरू केली. काही कंपन्यांसाठी लीगल इंटर्न म्हणूनही काम केलं. सध्या तो लंडनमध्ये एमबीए करतोय.
स्मृती इराणी यांनी शेनेल व अर्जुन भल्ला यांना साखरपुड्याच्या शुभेच्छा देताना मजेदार पोस्ट केली होती. ‘अर्जुन भल्ला ज्यांच्याकडे आता आमचे हृदय आहे, त्याचे या वेड्या कुटुंबात स्वागत आहे. सास-यांच्या रुपात एका वेड्या व्यक्तीचा सामना करण्यासाठी आणि त्यापेक्षा वाईट सासू म्हणजे माझा सामना करण्यासाठी तुला आशीर्वाद. आता तुला अधिकृत इशारा देण्यात आला आहे. शेनेल इराणी कायम आनंदी रहा,’ अशा या त्यांच्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली होती.