'अजूनबी विश्वास बसत नाय भावांनो...' किरण मानेंची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 19:56 IST2023-10-01T19:53:48+5:302023-10-01T19:56:00+5:30

किरण यांनी 'बिग बॉस मराठी' च्या आठवणींना उजाळा दिला.

Kiran Mane's emotional post ON Bigg Boss Marathi | 'अजूनबी विश्वास बसत नाय भावांनो...' किरण मानेंची भावूक पोस्ट

Kiran Mane

अभिनेते किरण माने यांनी 'मुलगी झाली हो' आणि 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमातून विशेष लोकप्रियता मिळवली. ते सोशल मीडियावरही विशेष सक्रीय असतात. इस्टाग्राम आणि फेसबुकवर ते विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आपली मतं व्यक्त करतात. नुकतेच किरण यांनी 'बिग बॉस मराठी' च्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. शिवाय, एक भावूक पोस्टही लिहली आहे. 


किरण माने लिहितात की, १ ऑक्टोबर...आज एक वर्ष झालं 'बिग बाॅस'च्या त्या नादखुळा घरात पाऊल ठेवलेल्याला. अजूनबी विश्वास बसत नाय भावांनो...तब्बल शंभर दिवस टिकून राहिलो त्या घरात ! या घरानं माझं आयुष्य लखलखीत करुन टाकलं... संघर्षाचं सोनं केलं... नव्हत्याचं होतं केलं... माझ्या चाहत्यांना पराकोटीचा आनंद दिला... मला पूर्वी ट्रोल करणारेबी प्रेमात पडले, चाहते झाले... द्वेष करणार्‍यांची बोलती बंद झाली... तिथनं परतल्यावर राजधानी सातार्‍यात पाऊल ठेवल्या-ठेवल्या माझ्यावर प्रेम करणार्‍यांनी माझी जल्लोषात मिरवणूक काढली ती आयुष्यभर विसरणार नाय गड्याहो !

"ह्या जादूई घरात पाऊल ठेवण्याआधी आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या वादळाला तोंड दिलं होतं. बलाढ्य यंत्रणेविरुद्ध जीवाच्या आकांतानं लढलो होतो. काळजावर झालेल्या खोट्या आरोपांच्या जखमा ओल्या होत्या. वेदनांनी घुसमटलो होतो. त्यामुळं आता हा माझ्यासाठी खेळ राहिला नव्हता, स्वत:ला सिद्ध करायची शेवटची संधी होती", असं त्यांनी लिहलं. 

पोस्टमध्ये माने यांनी लिहलं की, "मी जिद्दीची, चिकाटीची, धाडसाची, स्वत्वाची, सत्वाची परीसीमा गाठली... शारीरीक-मानसिक दोन्ही बळामध्ये निम्म्या वयाच्या तरण्याबांड पोरांना जबरी टक्कर देऊन चारी मुंड्या चित केलं... ज्यांना मित्र मानलं त्यांच्यासाठी मात्र सर्वस्व उधळलं".

पुढे ते लिहतात, "या घरानं मला तेजस्विनी लोणारी सारखी जिवाला जीव देणारी आयुष्यभराची मैत्रीण दिली. राखीबरोबर केलेले हेल्दी फ्लर्टिंग बाहेर प्रेक्षकांनी फुल्ल एंजाॅय केले. विक्याबरोबर नंतर-नंतर बिनसलं, पण तरीबी आम्ही दोघांच्या मैत्रीनं पहिले पाचसहा आठवडे अख्ख्या घराला भुंगा लावलावता. त्याच्याबरोबरचे ते दिवस अद्भूत होते".

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

"हा जो व्हिडीओ हाय... तो 'फायनॅलिस्ट' म्हणून बिगबाॅसनं मला केलेला 'सॅल्यूट' होता... माझं कौतुक करताना बिगबाॅसनं जे शब्द वापरलेत ते कायमचे काळजात कोरून ठेवलेत. 'अजिंक्य तारा... द किरण माने' ! माझ्या मनावरच्या सगळ्या जखमा भरून काढणारं, ते माझं जगातलं सगळ्यात मौल्यवान अवाॅर्ड हाय हे...लब्यू बिगबाॅस", या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 


किरण माने यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ते कलर्स वाहिनीवरील 'सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेत ते सिधुंताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका साकारत आहेत. शिवाय,  किरण माने किंग खानचे मोठे चाहते आहेत. जवान चित्रपट पदर्शित झाल्यापासून त्यांनी शाहरुख आणि चित्रपटासंबंधित अनेक पोस्ट केल्या आहेत.  

Web Title: Kiran Mane's emotional post ON Bigg Boss Marathi