"अन् चिंध्या-चिंध्या उडाल्या" मराठी अभिनेत्यानं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका यांचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 18:51 IST2025-05-07T18:47:01+5:302025-05-07T18:51:39+5:30
"पाकिस्तानला ठेचलं आणि देशातल्या द्वेष पसरवणाऱ्यांनाही" मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत!

"अन् चिंध्या-चिंध्या उडाल्या" मराठी अभिनेत्यानं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका यांचं केलं कौतुक
Kiran Mane Reaction Operation Sindoor: पहलगाम येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेत भारताने अखेर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी कॅम्प्सवर जोरदार हल्ला चढवला. 'ऑपरेशन सिंदूर' या नावाने या कारवाईत रात्री १.३० वाजता भारतीय लष्कराने ९ दहशतवादी केंद्रं उद्ध्वस्त केली. या कारवाईत अनेक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर, भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासोबत पत्रकार परिषदेद्वारे ऑपरेशन सिंदूरची महत्त्वाची माहिती सांगितली. दोघींचा एकत्र फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून याची मोठी चर्चा सुरू आहे. यातच मराठी अभिनेता किरण माने यांनी दोन्ही महिला अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे.
किरण माने यांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा फोटो पोस्ट केलाय. यासोबत कॅप्शनमध्ये किरण माने यांनी लिहलं, "कर्नल सोफिया कुरेशी या आपल्या भगिनीनं भारतानं केलेल्या कारवाईची माहिती प्रेसला दिली. सोबत होती विंग कमांडर व्योमिका सिंग. हा लष्कराचा खूप 'सूचक' सर्जिकल स्ट्राईक होता! आपल्या देशात एका विषारी पिलावळीनं मुस्लिम द्वेष पसरवून दूही माजवण्याचे रचलेले सगळे मनसुबे यामुळं आज उद्ध्वस्त झाले. "धर्म पुछा" या नरेटिव्हच्या चिंध्या-चिंध्या उडाल्या".
पुढे त्यांनी लिहलं, "त्या पाकिस्तानला तर गाडायचेच आहे, पण त्याचबरोबर आपल्या भुमीतले मानवतेचे आणि देशाचे दुश्मनही ठेचायचे आहे, हा 'संकेत' अभिमानाने काळजात जपून ठेवावा असा होता. या दोघींचा हा फोटो भारताच्या इतिहासातल्या हिंदू-मुस्लिम सलोख्याच्या परंपरेतला सगळ्यात शक्तिशाली आणि सुंदर फोटो आहे. हा आमचा भारत देश आहे. जय हिंद", या शब्दात किरण माने यांनी नारीशक्ती आणि भारताच्या या मोहिमेचं कौतुक केलं.
भारतीय सैन्याच्या या कारवाईला देशभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. फक्त किरण माने हेच नाही तर या कारवाईनंतर अनुपम खेर, रितेश देशमुख, हिना खान चिरंजीवी, देवोलिना भट्टाचार्जी यांसारख्या सेलिब्रिटींनीही आनंद व्यक्त केला आणि भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं. भारतीय सैन्याच्या या कारवाईने पाकिस्तानला एक स्पष्ट संदेश दिला आहे की, भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही.