‘कर्णसंगिनी’ या मालिकेतील अर्जुनाचा लूक आजवरच्या सगळ्या पौराणिक मालिकांपेक्षा असणार वेगळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 06:30 IST2018-10-10T16:18:14+5:302018-10-11T06:30:00+5:30

अभिनेता किंशुक वैद्य हा या मालिकेत सर्वश्रेष्ठ धर्नुधर व योद्धा अर्जुनाची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यास तो प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे.

kinshuk vaidya has new look for Karn Sangini serial | ‘कर्णसंगिनी’ या मालिकेतील अर्जुनाचा लूक आजवरच्या सगळ्या पौराणिक मालिकांपेक्षा असणार वेगळा

‘कर्णसंगिनी’ या मालिकेतील अर्जुनाचा लूक आजवरच्या सगळ्या पौराणिक मालिकांपेक्षा असणार वेगळा

महाभारताच्या पार्श्वभूमीवर एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेसाठी आतापर्यंत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले यांसारख्या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. ते दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कर्ण, उरुवी आणि अर्जुनाच्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील कर्णसंगिनी ही मालिका कविता काणे यांची प्रसिद्ध कादंबरी कर्णाज वाईफः द आऊटकास्ट क्वीन वर बेतलेली आहे. कधीही सांगण्यात न आलेल्या कर्ण आणि त्याची जोडीदार उरुवीच्या या कथेमधून सर्व सामाजिक आणि वर्गांच्या मर्यादा लांघणारी प्रेमकथा पाहायला मिळेल.

अभिनेता किंशुक वैद्य हा या मालिकेत सर्वश्रेष्ठ धर्नुधर व योद्धा अर्जुनाची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यास तो प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेसाठी तो प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेतील त्याचा लूक देखील खूप वेगळा असून या मालिकेसाठी तो सध्या दाढी वाढवत आहे.या मालिकेतून दिला जाणारा संदेश आजच्या काळातील मूल्यांशी साधर्म्य साधणारा असल्यानेही दाढी वाढलेला अर्जुन हा अधिक सुयोग्य वाटेल असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. आपल्या अर्जुनाच्या भूमिकेबद्दल किंशुक सांगतो, “अर्जुनाची भूमिका रंगविण्यास मी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांना प्रथमच दाढी वाढलेला अर्जुन पाहता येणार आहे. पुरुषांनी दाढी वाढविण्याचा ट्रेंड सध्या जगभर प्रचलित असून त्याच्याशी आम्ही सुसंगत अशी अर्जुनाची भूमिका साकारण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रेक्षकांना त्याचं हे रूप आवडेल, अशी आम्हाला आशा आहे.”

किंशुकचा दर्जेदार अभिनय आणि त्याचे हे रूप यामुळे प्रेक्षकांवर या अर्जुनाची नक्कीच चांगली छाप पडेल, यात शंका नाही. ही मालिका 9 ऑक्टोबरपासून सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7.00 वाजता ‘स्टार प्लस’वर प्रक्षेपित होणार आहे. 

Web Title: kinshuk vaidya has new look for Karn Sangini serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.