बिग बींना उलट उत्तर देणाऱ्या इशित भटला अखेर कळली त्याची चूक, म्हणाला - "मी नर्व्हस होतो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 16:38 IST2025-10-20T16:37:49+5:302025-10-20T16:38:22+5:30
Ishit Bhatt : इशित भट हे नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'कौन बनेगा करोडपती १७' या शोमध्ये गुजरातच्या १० वर्षांच्या इशित भटने आपल्या वागणुकीमुळे प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला होता.

बिग बींना उलट उत्तर देणाऱ्या इशित भटला अखेर कळली त्याची चूक, म्हणाला - "मी नर्व्हस होतो..."
इशित भट हे नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'कौन बनेगा करोडपती १७ ज्युनिअर्स'मध्ये काही दिवसांपूर्वी १० वर्षांचा इशित भट हा स्पर्धक सहभागी झाला होता. त्याच्या अतिआत्मविश्वासी आणि काहीशा उद्धट स्वभावामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी इशितवर जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर अखेर इशितला त्याची चूक कळली असून त्याने एका पोस्टद्वारे सर्वांची माफी मागितली आहे.
इशित भटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती करताना दिसतो आणि अमिताभ बच्चन यांनी ती मान्यही केली आहे. या व्हिडीओसोबतच इशितने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने आपल्या वागणुकीबद्दल खेद व्यक्त केला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''सर्वांना नमस्कार, 'कौन बनेगा करोडपती' या शोमधील माझ्या वागणुकीबद्दल मी मनापासून माफी मागतो. मला माहिती आहे की, मी ज्या पद्धतीने बोललो त्यामुळे अनेकांना दु:ख झाले, निराशा झाली किंवा माझा अनादर जाणवला आणि मला खरोखर त्याचे पश्चात्ताप आहे. खरंतर, त्या क्षणी मी खूप नर्व्हस झालो होतो आणि माझी वृत्ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने समोर आली. उद्धटपणा करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मी अमिताभ बच्चन सर आणि संपूर्ण 'केबीसी' टीमचा खूप आदर करतो.''
तो पुढे म्हणाला की, ''एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आपले शब्द आणि कृती कशा प्रकारे आपले प्रतिबिंब दर्शवतात, याबद्दल मला एक मोठा धडा शिकायला मिळाला आहे. मी भविष्यात अधिक नम्र, आदरणीय आणि विचारशील राहण्याचे वचन देतो. ज्यांनी अजूनही मला पाठिंबा दिला आणि या चुकीतून शिकण्याची संधी दिली, त्या सर्वांचे मी आभार मानतो.''
नेमकं काय घडलं होतं?
शोदरम्यान, इशित स्वतःला आत्मविश्वासू मुलगा असल्याचं दाखवत होता. पण त्याने अमिताभ बच्चन यांना खेळातले नियम समजावून सांगण्यात वेळ वाया घालवू नका, असे थेट सांगितले होते. त्याचे हे वागणे काही प्रेक्षकांना मजेशीर वाटले, तर अनेकांनी त्याला ज्येष्ठ अभिनेत्यांसोबत असं वागणे चुकीचे म्हटले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका झाली होती.