अवघ्या काही सेकंदात स्पर्धकाने १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर दिलं अन् KBC 17 ला मिळाला दुसरा करोडपती, अमिताभही झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:14 IST2025-12-31T14:12:57+5:302025-12-31T14:14:23+5:30
कौन बनेगा करोडपतीच्या १७ व्या सीझनला दुसरा करोडपती मिळाला आहे. या स्पर्धकाने कोणतीही लाईफलाईन न वापरता १ कोटींच्या प्रश्नाचं लगेच उत्तर दिलं

अवघ्या काही सेकंदात स्पर्धकाने १ कोटींच्या प्रश्नाचं उत्तर दिलं अन् KBC 17 ला मिळाला दुसरा करोडपती, अमिताभही झाले थक्क
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती सीजन १७' (KBC 17) ला या सीजनचा दुसरा करोडपती मिळाला आहे. झारखंडच्या रांची येथील रहिवासी असलेले बिप्लब बिस्वास यांनी हुशारीच्या जोरावर १ कोटी रुपये आणि एक कार जिंकली आहे. विशेष म्हणजे १ कोटीच्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी कोणत्याही लाईफलाईनशिवाय अवघ्या काही सेकंदात दिले, ज्यामुळे अमिताभ बच्चनही थक्क झाले.
काय होता १ कोटीचा प्रश्न?
अमिताभ बच्चन यांनी १ कोटी रुपयांसाठी विचारलेला प्रश्न असा होता की, "स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला फ्रान्समधून अमेरिकेत पोहोचवणाऱ्या जहाजाचे नाव काय होते?" बिप्लब यांनी कोणतीही लाइफलाइन न वापरता आणि वेळ न घालवता क्षणात उत्तर दिले - 'इसेरे' (Isere). त्यांना केवळ जहाजाचेच नाही, तर ते जहाज चालवणाऱ्या कॅप्टनचे नावही माहित होते. त्यांच्या या आत्मविश्वासामुळे अमिताभ बच्चन प्रभावित झाले आणि त्यांनी बिप्लब यांना आनंदाने मिठी मारली.
कोण आहेत बिप्लब बिस्वास?
बिप्लब बिस्वास हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नियुक्ती छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त अशा बीजापूर जिल्ह्यात आहे. खेळादरम्यान त्यांनी जंगलातील अत्यंत कठीण परिस्थिती आणि तिथे जिवंत राहण्यासाठी करावा लागणारा संघर्ष याबद्दल सांगितले. आपल्या शहीद सहकाऱ्यांच्या आठवणीने ते भावूक झाले, तेव्हा बिग बींनी त्यांना सांत्वन दिले.
अमिताभ बच्चन यांचे विशेष आमंत्रण
बिप्लब यांनी 'सुपर संदूक' राउंडमध्ये सर्व १० प्रश्नांची अचूक उत्तरे दिली, ज्यामुळे १ लाख रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले. त्यांच्या या उत्कृष्ट खेळावर खूश होऊन अमिताभ बच्चन यांनी बिप्लब आणि त्यांच्या कुटुंबाला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले आहे. आता १ कोटी रुपये जिंकल्यानंतर बिप्लब आता या सीजनचे पहिले 'सात करोडपती' बनणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील भागात ते ७ कोटी रुपयांसाठीच्या प्रश्नाचा सामना करणार आहेत.