'जोधा अकबर'मधील जलाल सध्या कुठे आहे? सोशल मीडियावरूनही गायब; अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 16:20 IST2026-05-16T15:22:26+5:302026-05-16T16:20:19+5:30
'जोधा अकबर' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता रजत टोकस सध्या कुठे आहे? सोशल मीडियावरून गायब आणि सहकलाकारांच्याही संपर्कात नाही.

'जोधा अकबर'मधील जलाल सध्या कुठे आहे? सोशल मीडियावरूनही गायब; अभिनेत्याने सोडली इंडस्ट्री?
Jodha Akbar Fame Rajat Tokas : मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर कोट्यवधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण यशाच्या शिखरावर असतानाच हे कलाकार अचानक लाईमलाईटपासून दूर गेले. असाच एक अभिनेता म्हणजे 'जोधा अकबर'मधील 'जलाल' म्हणजेच अकबराची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रजत टोकस (Rajat Tokas). 'जोधा अकबर' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला रजत गेल्या काही वर्षांपासून ग्लॅमर जगतातून पूर्णपणे गायब झाला आहे. तो सध्या काय करतोय? याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
रजत टोकसने अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे, पण खऱ्या अर्थाने त्याला लोकप्रियता मिळाली ती निर्माती एकता कपूरच्या 'जोधा अकबर' या मालिकेमुळे. या मालिकेतील रजत टोकस आणि अभिनेत्री परिधी शर्मा (जोधा) यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या भूमिकेमुळे रजतने अत्यंत कमी काळात अमाप लोकप्रियता मिळवली.
लग्नानंतर अभिनयाला ठोकला रामराम?
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, यशाच्या शिखरावर असतानाच रजतने लग्न केले आणि लग्नानंतर त्याने कामाचा वेग कमी केला. हळूहळू तो इंडस्ट्री आणि लाईमलाईटपासून पूर्णपणे दूर गेला. धक्कादायक बाब म्हणजे, आज रजत कुठे आहे आणि काय करतोय, याबद्दल त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनाही काहीच माहिती नाही.
अलीकडेच या मालिकेत 'बेगम रुकैया' ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री लवीना टंडन (Lavina Tandon) हिने रजतबद्दल एक मोठा खुलासा केला. तिने सांगितले की, "माझ्याकडे कधीच रजतचा फोन नंबर नव्हता आणि सेटवरही त्याच्याशी कधी फारसे बोलणे व्हायचे नाही. पण तो एक अत्यंत व्यावसायिक आणि उत्तम अभिनेता आहे". लवीनाने सांगितले की तिच्याकडे परिधी शर्माचा नंबर होता, पण रजत कोणाच्याच संपर्कात नाही.
सोशल मीडियावरूनही गायब; 'नागीन ३' ठरली शेवटची मालिका
रजत टोकस शेवटचा एकता कपूरच्याच 'नागीन ३' या मालिकेत झळकला होता. त्यानंतर तो कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसलेला नाही. विशेष म्हणजे, रजत सोशल मीडियावरही सक्रिय नाही. त्याने त्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट २०२४ मध्ये शेअर केली होती, त्यानंतर त्याने कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. दुसरीकडे, त्याची पत्नी सोशल मीडियावर सक्रिय असून तिने शेवटचा त्यांचा लग्नाचा फोटो २०२५ मध्ये शेअर केला होता. रजतच्या इन्स्टाग्रामवरील जुन्या पोस्टखाली चाहते आजही सतत कमेंट्स करत आहेत आणि त्याला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी कमालीचे उत्सुक असल्याचे सांगत आहेत.