"डॉक्टरांवर विश्वास ठेवला हीच चूक झाली" जिया शंकरची धक्कादायक पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:42 IST2025-10-05T16:42:22+5:302025-10-05T16:42:56+5:30
जिया शंकरनं वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

"डॉक्टरांवर विश्वास ठेवला हीच चूक झाली" जिया शंकरची धक्कादायक पोस्ट, म्हणाली...
प्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे सतत चर्चेत असणारे नाव आहे. अभिनेत्रीचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. रितेश देशमुखच्या 'वेड' चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे ती लोकप्रिय झाली. यानंतर 'बिग बॉस ओटीटी २' मधून ती घराघरात पोहोचली. जिया सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती आपले फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. तसंच ती कामाबद्दलच्या अपडेट्सही चाहत्यांना देत असते. नुकतंच अभिनेत्रीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
जियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे आपला एक अत्यंत वाईट अनुभव शेअर केला आहे. तिने मुंबई/भारतातील डॉक्टरांच्या कार्यशैलीवर थेट टीका केली आहे. तिच्या पोस्टमध्ये जियानं लिहलं, "भारत/मुंबईतल्या डॉक्टरांचं काय चाललंय? माफ करा. पण हे सगळं बोलावंसं वाटतंय. कारण- मी सतत नरकासमान अनुभव घेतला आहे".
जियाने पुढे जाऊन डॉक्टरांच्या शिक्षण आणि प्रॅक्टिसवर कठोर शब्दांत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिने म्हटले, "लोकांच्या आरोग्याशी खेळणं थांबवा. आधी नीट शिक्षण घ्या, प्रॅक्टिस करा आणि मग तुमचं फॅन्सी क्लिनिक सुरू करा किंवा एखाद्या प्रतिष्ठित हॉस्पिटलमध्ये नोकरी करा. डॉक्टरांबद्दल आदर आहे; पण त्यांच्यावर विश्वास ठेवला हीच चूक झाली".
दरम्यान, या पोस्टमध्ये जियाने नेमक्या कोणत्या घटनेबद्दल किंवा कोणत्या डॉक्टरांबद्दल लिहिले आहे, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, तिच्या या पोस्टमधून तिचा त्रास आणि खदखद स्पष्टपणे दिसून आली. अभिनयानंतर सोशल मीडियावरील या पोस्टमुळे जिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.