"मी पळून जाणार नाही..."; अटक झाल्यावर जय दुधाणेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "हनिमूनला जात असताना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 13:58 IST2026-01-04T13:56:29+5:302026-01-04T13:58:58+5:30
नुकतंच लग्न झालेल्या जयला फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन अटक केली. अखेर या प्रकरणानंतर जयने त्याची प्रतिक्रिया दिली आहे

"मी पळून जाणार नाही..."; अटक झाल्यावर जय दुधाणेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला- "हनिमूनला जात असताना..."
'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेला ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. मुंबई विमानतळावरुनच जयला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी फक्त जयच नव्हे तर त्याचे आजी-आजोबा, आई आणि बहीण यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखेर या संपूर्ण प्रकरणावर जय दुधाणेने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
टीव्ही ९ ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ''मी या सर्व प्रकरणाला हिंमतीने सामोरं जाणार आहे. मी कुठेही पळून जाणार नाही'', असं जय म्हणाला. जयने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे तो खोटा आहे. असं काही असेल तर सिद्ध करुन दाखवा. या प्रकरणी जे काय सत्य आहे, ते लवकरच सामोरं येईल. याशिवाय त्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, अशीही प्रतिक्रिया जयने दिली आहे.
जय आपली पत्नी हर्षला पाटीलसोबत हनिमूनला जात होता. त्यावेळी जयसोबत त्याचा भाऊ आणि वहिनीही परदेशात जाणार होते. अटकेचं पत्र आलं आहे, याबद्दल जयला कल्पना नव्हती. त्यामुळे विमानतळावरच अटक करुन 'देश सोडून जाऊ शकत नाही', असं पोलिसांनी जयला सांगितलं. या प्रकरणाला जय हिंमतीने तोंड देणार असल्याचं त्याने सांगितलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
जय दुधाणेने बनवट कागदपत्र तयार करुन लोकांना दुकानं विकली. दुकानांच्या या विक्रीचा व्यवहार जयने बेकायदेशीरपणे झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ही दुकानं खरेदी केलेल्या अनेक लोकांचं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. जयने केलेली ही फसवणूक ५ कोटींची असल्याचंही उघड झालंय. त्यामुळे जय आणि त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे