जालन्याच्या संकल्प काळेनं मारली बाजी; 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चा ठरला महाविजेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 11:27 IST2023-10-09T11:27:02+5:302023-10-09T11:27:25+5:30
Mi Honar Superstar Chhote Ustaad : मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. अटीतटीच्या या स्पर्धेत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली.

जालन्याच्या संकल्प काळेनं मारली बाजी; 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चा ठरला महाविजेता
स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच जल्लोषात पार पडला. संकल्प काळे, श्रुती भांडे, श्रेया गाढवे, सृष्टी पगारे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर या सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या स्पर्धेत जालन्याच्या संकल्प काळेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेती ठरली अकोल्याची श्रुती भांडे. नाशिकच्या सृष्टी पगारेने तृतीय क्रमांक पटकावला तर श्रेया गाढवे, रागिणी शिंदे आणि काव्य भोईर यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी गौरवण्यात आलं. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २चा विजेता संकल्प काळेला चार लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं.
विजेता ठरल्यानंतर संकल्प काळे म्हणाला, मी आजवर बऱ्याच कार्यक्रमांमध्ये भाग घेतला मात्र छोटे उस्तादच्या मंचाने मला संधी दिली आणि मला माझं गायन कौशल्य सादर करता आलं. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं.
संकल्प काळे जरी या पर्वाचा विजेता असला तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली दमदार कामगिरी दाखवली आहे.