खरं की काय? ईशा केसकरच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकाही घेणार निरोप? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:40 IST2025-12-01T12:34:02+5:302025-12-01T12:40:57+5:30
ईशा केसकरच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकाही घेणार निरोप? 'या' कारणामुळे प्रेक्षकांमध्ये होतेय चर्चा

खरं की काय? ईशा केसकरच्या एक्झिटनंतर 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकाही घेणार निरोप? चर्चांना उधाण
Laxmichya Paulani Serial: छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय. या मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे या दैनंदिन मालिकांमध्ये थोडाजरी बदल झाल तरी त्याचा फटका नक्कीच टीआरपीला बसतो. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी वाहिन्या नानविध प्रयोग करताना दिसतात. सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची मांदियाळी पाहायला मिळते. नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली आहे. आता नवीन मालिका सुरु होणार म्हटल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या.
अलिकडेच अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असलेली मी सावित्रीबाई फुले या मालिकेची घोषणा करण्यात आली. येत्या ५ जानेवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर 'वचन दिले तू मला'या आपल्या आगामी मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी मालिका बंद होणार का अशा उलट-सुलट चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या आहेत.
लक्ष्मीच्या पावलांनी घेणार निरोप
दरम्यान, 'वचन दिले तू मला' या नव्या मालिकेची प्रक्षेपण वेळ 'लक्ष्मीच्या पावलांनी'च्या स्लॉटवरच असल्याने या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता ही मालिकाच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ईशा केसकरच्या जागी अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर हिची 'कला' म्हणून एन्ट्री झाली होती.हा बदल स्विकारत असतानाच प्रेक्षकांना वाहिनीने वचन दिले तू मला मालिकेची प्रसारणाची वेळ पाहून अनेकतर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र, वाहिनीने अद्याप याबाबत अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असायची.अद्वैत आणि कलाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र, मुख्य नायिकेचा बदल आणि आता मालिका बंद होण्याच्या शक्यतेमुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.