Interview : ...अन् माझे आणि पप्पांचे स्वप्न पूर्ण झाले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 18:24 IST2017-10-29T12:54:33+5:302017-10-29T18:24:33+5:30
-रवींद्र मोरे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संगीताच्या जगतात पदार्पण करणारी अहमदनगरची ११ वर्षीय अंजली गायकवाडने खूपच मेहनत केली आहे. ...
.jpg)
Interview : ...अन् माझे आणि पप्पांचे स्वप्न पूर्ण झाले !
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संगीताच्या जगतात पदार्पण करणारी अहमदनगरची ११ वर्षीय अंजली गायकवाडने खूपच मेहनत केली आहे. आपल्या सुरेल आवाजाच्या जादूने मंत्रमुग्ध करणाऱ्या अंजनीने नुकताच ‘सा रे गा मा पा लिटल चॅँप्स २०१७’ चा अॅवार्ड पटकाविला. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत असून तिच्याशी ‘सीएनएक्स’ने मारलेल्या दिलखुलास गप्पा...
* तुला हा अॅवार्ड मिळाल्याबद्दल कसे वाटत आहे?
- खूपच छान वाटत असून सुरुवातीपासून माझे आणि पप्पांचे स्वप्न होते की, जिंकायचे आहे. खूप मेहनत घेतली, पप्पांनीही सपोर्ट केला आणि जिंकली. हा अॅवार्ड मिळाल्याने माझे आणि पप्पांचेही स्वप्न पूर्ण झाले.
* गायन क्षेत्राकडे कशी आणि का वळली?
- मला गायनाची लहानपणापासूनच आवड आहे, शिवाय घराचीही पार्श्वभूमि संगीताचीच आहे. माझे पप्पा अंगद गायकवाड, स्वत: संगीताचे प्रसिद्ध प्राध्यापक आहेत. ते बऱ्याच वर्षापासून संगीताचे क्लासही घेतात. मला त्यांच्याकडूनच ही शिकवण मिळाली असून या क्षेत्राकडे वळणे साहजिकच होते.
* ‘सचिन : ए बिलियन ड्रिम्स’ या चित्रपटात तू ‘मर्द मराठा...’ हे गाणे गायले आहे, हा अनुभव कसा होता?
- खूपच छान! मला अभिमान वाटतो की, मला ही संधी मिळाली. या गाण्यानिमित्त मी पहिल्यांदाच ए. आर. रहेमान सरांना भेटली. त्यांनी जेव्हा माझे क्लासिकल गाणे ऐकलेत तेव्हा त्यांनी माझे खूप कौतुकही केले आणि त्यांनी माझ्यासोबत सेल्फीही घेतली. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणिय आहे.
* तू पुढील करिअर विषयी काय ठरवले आहे?
- मला क्लासिकल सिंगिंग आणि लाइट म्युझिकमध्ये करिअर करायचे आहे. विशेषत: मला माझे करिअर घडविण्यात मम्मी, पप्पा आणि बहिणीचा मोठा सपोर्ट मिळत आहे.
* गायन क्षेत्रातील तुझे गुरु आणि प्रेरणास्त्रोत कोण आहेत?
- माझे गुरु माझे वडिलच आहेत. शिवाय लता दिदी आणि आशा दिदींचे जुने गाणे आणि कौशिकी चक्रवर्ती तसेच मालिनी राजूरकर यांचे गाणे मी नेहमी ऐकत असते. यांच्याकडूनच मला प्रेरणा मिळत राहते.
* गायन क्षेत्रात येणाऱ्या नवोदित कलाकारांना काय संदेश देशिल?
- या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. शिवाय आपले गुरु आणि प्रेरणास्थान यांचा नेहमी आदर करावा आणि माझ्यासारखे यशस्वी व्हावे.