रुची सवर्ण मोहन म्हणतेय, माझ्यासाठी पैशापेक्षा समाधान महत्त्वाचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 10:02 IST2016-12-24T17:50:28+5:302016-12-26T10:02:35+5:30
प्राजक्ता चिटणीस सखी या मालिकेत रुची सवर्ण मोहनने प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर ती तमन्ना आणि अजीब दास्ताँ ...

रुची सवर्ण मोहन म्हणतेय, माझ्यासाठी पैशापेक्षा समाधान महत्त्वाचे
सखी या मालिकेत रुची सवर्ण मोहनने प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर ती तमन्ना आणि अजीब दास्ताँ है ये या हिंदी मालिकांमध्ये झळकली. आणि आता सख्या रे या मालिकद्वारे ती पुन्हा मराठी मालिकेत काम करत आहे. तिच्या या भूमिकेविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...
रुची तू मराठी आणि हिंदी दोन्ही मालिकांमध्ये काम करतेस, दोन्ही इंडस्ट्रीत काम करताना तुला काय फरक जाणवतो?
मराठीतील वातावरण हे खूप फ्रेंडली आहे तर हिंदीतील वातावरण खूप वेगळे आहे. तिथे प्रत्येक जण दृश्यांच्यामध्ये मिळत असलेल्या वेळेत आपापल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलेला असतो. कलाकारांचा एकमेकांशी म्हणावा तितका एकमेकांशी संपर्क नसतो तर दुसरीकडे मराठीत एकच मेकअपरूम जरी कलाकारांनी शेअर करायला सांगितला तरी ते कटकट करत नाहीत. हिंदीत पैसा जास्त असला तरी मराठीतील वातावरण हे मला अधिक आवडते. मी पैशापैक्षा कामातील समाधानाला अधिक महत्त्व देते.
सखी या मालिकेनंतर मराठी मालिकेत तू इतक्या महिन्यांचा गॅप का घेतलास?
सखीनंतर मी तमन्ना ही हिंदी मालिका करत होते. त्यामुळे मी मराठीकडे वळले नाही. तमन्ना ही मालिका संपल्यानंतर मी एखाद्या चांगल्या भूमिकेच्या शोधातच होते. त्याचवेळी मला चिन्मय मांडलेकरने सख्या रे या मालिकेसाठी विचारले. चिन्मयसोबत काम करायला मिळतेय हा विचार करूनच मी मालिकेला लगेचच होकार दिला आणि आता तर मालिकेची कथा ऐकल्यावर मी माझ्या व्यक्तिरेखेच्या प्रेमातच पडले आहे. एक कलाकार म्हणून या मालिकेत काम करणे मी एन्जॉय करत आहे.
सख्या रे या मालिकेत प्रेक्षकांना तू कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेस?
ही मालिका एक रहस्य मालिका असल्याने मालिका सुरू झाल्यानंतरही हे रहस्य कोणाबद्दल असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्कीच लागून राहाणार आहे. या मालिकेत मी राजघराण्यातील मुलगी असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मालिकेतील माझी भूमिका खूपच इंटरेस्टिंग आहे.
या मालिकेच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा आहे?
चिन्मय स्वतः एक अभिनेता असल्याने चित्रीकरण करताना कलाकाराला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची चांगलीच कल्पना अाहे. चित्रीकरण करत असताना शिफ्टपेक्षा जास्त वेळ कलाकाराला थांबायला लागू नये असे त्याने टीमला सुरुवातीपासूनच सांगितले आहे. त्यामुळे चिन्मयच्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना आम्हाला खूप चांगले वाटत आहे. तसेच या मालिकेचे आम्ही आऊटडोअर शूटही करत आहोत. खूपच कमी मालिकांचे आऊटडोर शूट केले जाते. त्यामुळे हादेखील आमच्यासाठी एक वेगळा अनुभव आहे.