“मोठ्या वयाच्या महिलेच्या प्रेमात पडण्यास माझी काही तक्रार नाही!”- करण जोटवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 09:54 AM2018-01-24T09:54:31+5:302018-01-24T15:24:47+5:30

टीव्ही मालिकांमध्ये भूमिका रंगविणारा करण जोटवाणी पुन्हा एकदा एका मालिकेत भूमिका साकारण्यास सिध्द झाला आहे. ‘झी टीव्ही’वरील ‘आप के ...

"I have no problem falling in love with a woman of a bigger age!" - Karan Jotwani | “मोठ्या वयाच्या महिलेच्या प्रेमात पडण्यास माझी काही तक्रार नाही!”- करण जोटवाणी

“मोठ्या वयाच्या महिलेच्या प्रेमात पडण्यास माझी काही तक्रार नाही!”- करण जोटवाणी

googlenewsNext
व्ही मालिकांमध्ये भूमिका रंगविणारा करण जोटवाणी पुन्हा एकदा एका मालिकेत भूमिका साकारण्यास सिध्द झाला आहे. ‘झी टीव्ही’वरील ‘आप के आ जाने से’ या रोमँटिक मालिकेत तो साहिल अगरवाल या आनंदी, स्वच्छंदी स्वभावाच्या तरुण नायकाची भूमिका रंगवीत आहे. या मालिकेचा विषय अगदी वेगळा आहे; कारण यातील नायक त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका महिलेच्या प्रेमात पडताना दाखविला आहे. या मालिकेबद्दल करण उत्सुक आणि आशावादी असून त्याने ही भूमिका साकारतानाचा अनुभव या मुलाखतीत व्यक्त केला आहे.

तू अभिनयाला कधी प्रारंभ केलास? तू तुझ्या पूर्वीच्या मालिकांची माहिती दे.
मी 2014 वर्षाच्या मध्यापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. कारण त्याच सुमारास मी माझ्या पहिल्या मालिकेच्या करारावर स्वाक्षरी केली होती. कैसी ये यारीया, लौट आओ तृषा, सुहानी सी एक लडकी या मालिकांमध्ये मी भूमिका रंगविल्या असून आता मी आप के आ जाने से या मालिकेत प्रमुख भूमिका साकारीत आहे. याशिवाय मी अनेक जाहिरातींतून कामं केली आहेत.

तुला ही भूमिका कशी मिळाली?
मी दुसऱ्याच एका मालिकेसाठी या मालिकेच्या सर्जनशील प्रमुख पर्सिस मॅडमशी संपर्क साधला होता. तेव्हा त्यांनी मला या मालिकेसाठी ऑडिशन देण्यासंबंधी विचारलं. तेव्हा मी त्यांना या मालिकेची कथा, व्यक्तिरेखा वगैरेसंबंधी विचारणा केली. त्या म्हणाल्या की आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या एका महिलेच्या प्रेमात पडणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. ते ऐकून माझी उत्सुकता चाळविली गेली आणि मी त्यांना लगेच होकार कळविला.

तू ही भूमिका का निवडलीस?
‘आपके आ जाने से’ ही एक अगदी हटके प्रेमकथा आहे. अशा घटना वास्तव जीवनातही घडतात, पण त्या तितक्या प्रमाणात उघड होत नाहीत. या मालिकेद्वारे आम्ही वेदिका आणि साहिल यांची प्रेमकथा प्रेक्षकांपुढे सादर करीत आहोत. या कथेमुळे रोमँटिक मालिकांतील साचेबध्दता मोडीत निघेल, असं मला वाटतं. या कथेतून आम्ही प्रेमकथेत पूर्वापार चालत आलेल्या लिंगभेदाच्या विषयाला हात घातला आहे. एखादा पुरुष त्याच्या वयापेक्षा खूप लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडू शकतो, तर आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात एखादी महिला का पडू शकत नाही? अशा आगळ्या प्रेमकथेमुळे आणि या विषयाच्या हाताळणीमुळे मी या मालिकेतील भूमिकेला होकार दिला.

तुझ्या व्यक्तिरेखेची माहिती दे.
मी यात साहिल अगरवाल या 24 वर्षांच्या तरुणाची भूमिका साकारणार आहे. साहिल हा जीवनावर प्रेम करणारा खुशालचेंडू तरूण असतो. साहिल आपल्याच मस्तीत इतका मश्गुल झालेला असतो की इतरांच्या मते त्याला जीवनात कसलेही ध्येय नसते किंवा कोणतेही लक्ष्यही नसते. तो एक स्वच्छंदी, उत्साही आणि आशावादी तरुण असतो. तो आपल्या भावना उघडपणे व्यक्त करीत असे आणि समाज काय म्हणेल, याची तो पर्वा करीत नाही. वेदिकाच्या प्रेमात पडल्यावर त्यांच्यातील वयाचा फरक आपल्या प्रेमाच्या मार्गात अडथळा ठरणार नाही, याची दक्षता साहिल घेतो. उलट आपल्या भविष्याबद्दल तो आत्मविश्वास व्यक्त करतो.

या भूमिकेसाठी तू कशी पूर्वतयारी केलीस?
खरं सांगायचं तर मला पूर्वतयारी करायला वेळच मिळाला नाही. चित्रीकरण सुरू होण्याच्या आधी आठवडाभर मी साहिलसारखा वागण्याचा आणि जीवनाकडे हलक्याफुलक्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. कोणतीही भूमिका उभी करण्यापूर्वी त्या व्यक्तिरेखेचं व्यक्तिमत्त्व, तिच्या सवयी, तिचे विचार वगैरे जाणून घेणं आणि तिच्या अंतरंगात प्रवेश करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. तरच तुम्ही ती व्यक्तिरेखा विश्वासार्ह पध्दतीने उभी करू शकता. माझा स्वभाव साहिलसारखाच आहे, असं मला वाटतं. मला माझ्या मर्जीनुसार जगायचं आहे. मला जे करायचं आहे, त्यावर लोक काय म्हणतील, याची मी पर्वा करीत नाही. आमच्या स्वभावातील या साम्यामुळे मला साहिलची व्यक्तिरेखा उभी करणं खूपच सोपं गेलं.

या मालिकेच्या संकल्पनेवर तुझं मत काय आहे- आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडणं एखाद्या महिलेसाठी योग्य आहे काय?
प्रेम ही अशी एक शक्तिशाली भावना आहे की जी जात, धर्म, आर्थिक परिस्थिती आणि कधी कधी वय या सर्वांच्या पलिकडे जाते. प्रेमाला कोणतेही कायदे लागू होत नाहीत आणि हृदयाच्या गोष्टी निव्वळ तर्काच्या आधारे स्पष्ट करता येत नाहीत. दोन व्यक्ती एकमेकाला अनुरूप आहेत का, याचा जेव्हा समाज विचार करतो, तेव्हा बरेचदा ज्यांनी ही समाजमान्य अनुरूपता मोडलेली असते, त्यांच्याशी तुलना केली जाते. तुमचा आपल्या प्रेमावर विश्वास असेल आणि सर्व अडचणींना ते पुरून उरेल, याची खात्री असेल, तर इतरांच्या वक्तव्याकडे लक्ष न देता आपल्या प्रेमाचा स्वीकार करा. 

पडद्यावर आपल्यापेक्षा वयाने मोठ्या महिलेवर प्रेम करण्याबद्दल तुझं काय मत आहे?
टीव्हीच्या पडद्यावर तरी वयाने मोठ्या असलेल्या महिलेवर प्रेम करण्याचा अनुभव अदभुत होता. तुम्ही जेव्हा प्रेमात पडता तेव्हा त्या व्यक्तीचं वय काय आहे, तिचं शरीर कसं आहे, तिच्या अंगावर सुरकुत्या आहेत का वगैरे गोष्टींचा विचारही तुमच्या मनात येत नाही. प्रेमात तुम्ही आंधळे होता, असं माझं मत आहे.

तुझी ‘नायिका’ सुहासी धामी हिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
फारच छान! सुहासी ही अनुभवी कलाकार असून मला तिच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. पहिल्या दिवसापासूनच आमच्यात चांगलं नातं निर्माण झालं आहे. तेव्हापासून आतापर्यंत सारं काही सुरळीत पार पडत आहे. आमच्यात चांगलं सख्य असून आमचं कामही सुरळीत चालतं.

वास्तव जीवनातही तुझ्याबाबत असं घडलं- तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या तू प्रेमात पडलास- तर तू काय करशील?
त्यामुळे काही समस्या निर्माण होईल, असं मला वाटत नाही. वैयक्तिकदृष्ट्या म्हणाल, तर वयाने मोठ्या असलेल्या महिलेच्या प्रेमात पडण्यास माझी तशी काही हरकत नाही. तुम्हाला मनापासून योग्य वाटत असेल, तर ज्याच्यावर तुम्हाला प्रेम करावंसं वाटतं, त्याच्यावर तुम्ही ते करीत राहिलं पाहिजे. पण ती गोष्ट योग्य आहे हे तुम्हाला पटलं पाहिजे. आपलं मन आपल्याला तसं सांगत असतं. एक व्यक्ती म्हणूनही माझे हेच विचार आहेत.

Web Title: "I have no problem falling in love with a woman of a bigger age!" - Karan Jotwani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.