मला एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायचे नाहीयेः अली असगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2017 14:44 IST2017-07-21T09:14:23+5:302017-07-21T14:44:23+5:30

अली असगरने आतापर्यंत कहानी घर घर की, कुटुंब यांसारख्या मालिकांमध्ये तर चमत्कार, पार्टनर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याने ...

I do not want to fall into the same type of role: Ali Asghar | मला एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायचे नाहीयेः अली असगर

मला एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायचे नाहीयेः अली असगर

ी असगरने आतापर्यंत कहानी घर घर की, कुटुंब यांसारख्या मालिकांमध्ये तर चमत्कार, पार्टनर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याने कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमात साकारलेली दादी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. द कपिल शर्मा या शोमधील त्याची नानीची व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना भावली होती. पण आता त्याने या कार्यक्रमाला रामराम ठोकला असून तो द ड्रामा कंपनी या कार्यक्रमात झळकणार आहे. या त्याच्या नव्या कार्यक्रमाविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम तू सोडल्यानंतर तुझ्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे, हा कार्यक्रम सोडण्यामागे काही खास कारण होते का?
कपिल शर्मासोबत झालेल्या विमानाच्या प्रकरणानंतर मी हा कार्यक्रम सोडला असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण कार्यक्रम सोडण्याचा निर्णय मी काही एका दिवसात घेतलेला नाहीये. मला कपिल शर्मासोबत काहीही प्रोब्लेम नाहीये. विमानात जे काही घडले त्याचा देखील मला काहीही प्रोब्लेम नाहीये. केवळ व्यक्तिरेखेमुळे मी हा कार्यक्रम सोडला. नानीची व्यक्तिरेखा खूपच कमी वेळासाठी कार्यक्रमात दाखवली जात होती. माझ्यासाठी वेळ देखील महत्त्वाचा नव्हता. पण नानीची व्यक्तिरेखा खुलत असल्याचे मला जाणवत नव्हते. त्यामुळे एप्रिलमध्ये माझे कॉन्ट्रक्ट रिन्यूव्ह करू नका असे मी कार्यक्रमाच्या टीमला आधीच सांगितले होते. 

तू आता ड्रामा कंपनीमध्ये झळकणार आहेस, या कार्यक्रमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे?
ड्रामा कंपनीमध्ये प्रेक्षकांना रोज नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. प्रत्येक दिवशी एक नवी कथा असणार आहे. कधी या कार्यक्रमात मी तुम्हाला पुरुषाच्या वेशात तर कधी स्त्रीच्या वेशात दिसेन. एकाच कार्यक्रमात अनेक व्यक्तिरेखा साकारायला मिळत असल्याने मी सध्या खूप खूश आहे.

स्त्री व्यक्तिरेखा साकारायची नाही असे तू ठरवले असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती, त्याबद्दल काय सांगशील?
स्त्री व्यक्तिरेखा साकारायची नाही असे मी कधीच म्हटलो नव्हतो. केवळ मला त्याच प्रकारच्या व्यक्तिरेखांमध्ये अडकून राहायचे नाहीये. खरे तर मी पुरुष असताना स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते आणि प्रेक्षकांनी मला त्या भूमिकेत पसंत देखील केले. पण आता स्त्री भूमिकेसोबत आणखी काही तरी वेगळे करायचे असे मी ठरवले आहे.

तू इतिहास, कहानी घर घर यांसारख्या मालिकेमध्ये सिरियस भूमिका साकारल्या आहेत, तू पुन्हा तशा प्रकारच्या भूमिकेत कधी दिसणार आहेस?
मला किती वर्षं झाले कोणीही सिरियस भूमिकेसाठी विचारत नाही. त्यामुळे या भूमिकांमध्ये मी सध्या दिसत नाहीये. खरे तर डेली सोपमध्ये काम करण्यासाठी आता माझ्याकडे वेळ देखील नाहीये. पण एखाद्या चांगल्या भूमिकेची ऑफर मिळाली तर मला नक्कीच सिरियस भूमिका साकारायला आवडेल.

तुझ्या करियरचा टर्निंग पॉईंट कोणता आहे असे तुला वाटते?
कहानी घर घर की या मालिकेत मी कमल ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला अनेक छटा होत्या प्रेक्षकांनी या भूमिकेला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेमुळे माझे संपूर्ण करियरच बदलले. त्यामुळे ही मालिका माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरली असे मी नक्कीच सांगेन. एकता कपूरने मला दिलेल्या या भूमिकेसाठी मी नेहमीच त्यांचा ऋणी राहील. कहानी घर घर की या मालिकेच्याआधी मी इतिहास या मालिकेत काम केले होते. इतिहासदेखील बालाजी प्रोडक्शनचीच मालिका होती. इतिहास या मालिकेच्या वेळेचा तर एक भन्नाट किस्सा आहे. या मालिकेत डॉनची भूमिका साकारशील का असे एकताने मला विचारले असता ही मालिका लहान मुलांची आहे का असा मी तिला प्रश्न विचारला होता. कारण त्या आधी मी कधीच सिरियस भूमिका साकारली नसल्याने माझ्यासोबत मस्करी केली जात आहे असेच मला वाटत होते. पण या मालिकांमुळे एक अभिनेता म्हणून प्रेक्षक माझ्याकडे गंभीररित्या पाहू लागले.

तू गेली अनेक वर्षं कॉमेडी भूमिका साकारत आहेस, तुझ्यामते विनोद हा कशा पद्धतीचा असावा?
सध्या व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही विनोद आपल्याला कार्यक्रमात पाहायला मिळतात. पण विनोद हा एखाद्याच पद्धतीचा असावा असे मला वाटत नाही. कारण समोरच्याला हसवणे हे खूपच कठीण असते. प्रेक्षक तुमच्या विनोदाने हसत असतील तर प्रेक्षकांनी तुम्हाला दिलेली ती पावतीच असते आणि सध्या मालिका, चित्रपट यांच्याप्रमाणे वेबसिरिजदेखील एक माध्यम आहे आणि या सगळ्याच माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विनोदाला प्रेक्षक पसंती देतात असे मला वाटते. 

Also read : ​Exclusive : ​या कारणांमुळे अली असगरने सोडला द कपिल शर्मा शो

Web Title: I do not want to fall into the same type of role: Ali Asghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.