"एक कलाकार आणि मोठा भाऊ म्हणून मला प्रियाचं नेहमीच कौतुक वाटतं", सुबोध भावेनं व्यक्त केल्या भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 23:17 IST2025-09-13T23:17:03+5:302025-09-13T23:17:35+5:30
अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) प्रियाचा चुलत भाऊ होता. सुबोधने नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रियासोबतचं बालपण आणि तिच्यासोबत कामाचा अनुभवाबद्दल सांगितले.

"एक कलाकार आणि मोठा भाऊ म्हणून मला प्रियाचं नेहमीच कौतुक वाटतं", सुबोध भावेनं व्यक्त केल्या भावना
मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं (Priya Marathe) ३१ ऑगस्ट रोजी निधन झालं. तिच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) प्रियाचा चुलत भाऊ होता. सुबोधने नुकतंच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रियासोबतचं बालपण आणि तिच्यासोबत कामाचा अनुभवाबद्दल सांगितले.
सुबोध भावेने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रिया मराठेच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, असं तिचं अकस्मात निघून जाणं सगळ्यांसाठी भयंकर धक्कायदायक आहे. तिची आई, तिचा नवरा, मोठा भाऊ विवेक यांच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. कारण त्यांच्यासोबत सर्वात जास्त तिचा सहवास होता. दुर्देवाने तिचे वडील म्हणजे माझ्या काकाचं प्रियाच्या लहानपणी निधन झालं. सुहास काका घरी येतोय म्हटलं की चैतन्य असायचं. तो खेळकर, खूप उत्साही, प्रत्येक गोष्टीत स्वतःला झोकून काम करणारा आणि मल्टी डायमंशियल होता. अनेक ठिकाणी त्याने व्यवसाय केले. ठाण्यात त्याने प्रिया कॉर्नर सुरू केलं होतं. असा वेगवेगळ्या पद्धतीने आनंदाने आयुष्य जगणारा असा होता आणि त्याचे अनेक गुण प्रियामध्ये आले होते. मी मुद्दामून सुहास काकाबद्दल सांगितलं कारण त्याची खूप पर्सनॅलिटी प्रियामध्ये उतरली होती.
''माझ्यापेक्षा प्रिया १२ वर्षांनी लहान होती...''
तो पुढे म्हणाला की, माझ्यापेक्षा प्रिया १२ वर्षांनी लहान होती. तिचा भाऊ विवेक आणि मी एका वयाचे आहोत. त्यामुळे आम्ही लहानपणापासून खूप खेळलो आहे. पण जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा प्रियाचा जन्म झाला नव्हता. तिचा जन्म झाला तेव्हा आम्ही १२ वर्षांचे होतो. दहावी सुरू झाली. त्याचं पुण्यात येणं आणि माझं ठाण्यात हळूहळू जाणं कमी झालं. व्याप वाढू लागले. लहानपणी भाऊ म्हणून विवेकसोबत जितकं माझं असोसिएशन होतं, तितकं प्रियासोबत नव्हतं. कारण आमच्या वयातलं अंतर होतं. मला कायमचं तिच्याबद्दल कौतुक वाटायचं. ती लहानपणापासून तितकीच एनर्जीटिक, तितकीच हसरी, माणसांमध्ये रमणारी, प्रत्येकाला समजून घेणारी, जो माणूस तिच्या आयुष्यात आला तो कधीच तिच्यापासून तुटला नाही. हे मी फक्त मित्र, नातेवाईकांबद्दल बोलत नाहीये तर तिचे चाहतेसुद्धा आले. लोकांनी भरभरून प्रियाबद्दल लिहिलंय. इतकं प्रेम तिच्यावर ते करत होते. तिचा भाऊ म्हणून तिचा सहकलाकार म्हणून तिचा प्रचंड अभिमान आहे.
प्रिया-सुबोधने या प्रोजेक्टमध्ये केलेलं काम
प्रियाच्या आजारपणाच्या काळात माझी काकू आणि शंतनू यांनी तिला खूप जपलं, सांभाळलं. नशीबाने मला चार कामं तिच्यासोबत करता आली. आमच्या दोघांची एकत्र पहिली मालिका कळत नकळत. त्यात माझं निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. प्रियाच्या मागे लागून मी प्रेमाच्या जाळ्यात तिला ओढतो. जेव्हा ती पहिल्या दिवशी मालिकेच्या सेटवर आली तेव्हा तिला म्हटलं की, तू का घेतला हा रोल. विचारायचंस तरी ही भूमिका कोण करतो आहे. त्यावेळी तिच्यापेक्षा मी सीनियर होतो. तेव्हा ती म्हणाली की, दादा आपलं काम आपण काम चोख पद्धतीने करुयात. आपलं भावं बहिणीचं नातं कॅरेक्टरमध्ये नको आणूयात. तेव्हा मॅच्युरिटी पाहून मी भारावून गेलो. आम्हाला दोघांना खूप मज्जा आली. त्यानंतर आम्ही किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी हा सिनेमा एकत्र केला. त्यात प्रिया माझी बायको होती. मग गोविंद निहलानी यांचा पहिला मराठी सिनेमा ती आणि इतर हा सिनेमा केला. त्यातही ती होती.
या गोष्टीसाठी सुबोधला प्रियाचं खूप कौतुक वाटतं
त्याने पुढे सांगितलं की, त्यानंतर आता शेवटी तू भेटशी नव्याने या मालिकेत आम्ही एकत्र काम केलं. त्यात ती निगेटिव्ह भूमिका करत होती. ती माझ्या मागे लागलेली असते. त्यावेळी तिला सेटवर बघून मला इतका आनंद झाला होता. कारण त्याआधी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यातून ती बाहेर पडली होती. त्यानंतर तिने नाटकाचे प्रयोग केले होते. इथे आणि अमेरिकेत दौरा केला होता. अचानक ती या मालिकेत ती माझ्यासमोर आली. तिला पाहून मला खूप बरं वाटलं. इतकी ताजीतवानी, फ्रेश दिसत होती. दिसायला अत्यंत सुंदर असूनही तिने खलनायिका तितक्याच उत्तमपणे वठवले. मी आजही सेटवर गेलो की माझे सीन पाठ नसतात. प्रिया सेटवर असायची तेव्हा तिचे सगळे सीन पाठ असायचे. एक मोठा भाऊ म्हणून सुद्धा आणि एक सहकलाकार म्हणून सुद्धा तिच्याबद्दल अपार कौतुक आणि प्रेम होतं. मराठी सिनेइंडस्ट्रीने प्रियाची दखल जितक्या प्रमाणात घ्यायला हवी होती तितक्या प्रमाणात घेतली नाही. पण अतिशय दिसायला गोड, उत्तम काम, प्रामाणिक काम करणारी प्रिया होती.