"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 12:06 IST2025-07-07T12:05:49+5:302025-07-07T12:06:22+5:30

Hindustani Bhau on MNS Attack: हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने राज ठाकरेंना विनंती करत मनसेविरोधी भूमिका घेतली आहे. 

hindustani bhau opposed mns action appealed raj thackeray said please dont beat them | "कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

राज्यात हिंदी भाषा मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. अशातच मनसैनिकांनी मुंबईत एका गुजराती व्यापाराला मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. वरळीत झालेल्या विजयी मेळाव्यातील सभेतही राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं होतं. आता हिंदुस्तानी भाऊने याचा तीव्र निषेध व्यक्त करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने राज ठाकरेंना विनंती करत मनसेविरोधी भूमिका घेतली आहे. 

व्हिडिओत काय म्हणाला हिंदुस्तानी भाऊ?

"जय महाराष्ट्र! आणि हा जय महाराष्ट्र आहे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंना.... साहेब, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावननगरीत... या महाराष्ट्रात मराठी भाषा ही गर्व नाही तर माज आहे, असं बोललं जातं. मराठी असल्याचा गर्वच नाही माज आहे. साहेब, पण या मराठीच्या नावावर इथे आलेल्या भारतातल्या हिंदू लोकांना मारणं चुकीचं आहे. शाळेत असो कॉलेजमध्ये असो ही मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी जेवढी ताकद तुम्हाला लावायची आहे तेवढी लावा साहेब. संपूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण, साहेब गोरगरीबांना मारणं खूप चुकीचं आहे. ते आज इथे नोकरी करायला आले आहेत. आज आपले महाराष्ट्रातील लोक दुसऱ्या राज्यात शिकायला, काम करायला गेली आहेत. तिथले लोक हे सगळं बघत आहेत की एका भाषेसाठी मराठी भाषेसाठी आपल्या लोकांना मारलं जातंय. तुम्ही विचार करा साहेब त्या लोकांनी तिथे आपल्या मराठी लोकांबरोबर असं केलं तर... तेव्हा काय करणार?" 


पुढे तो म्हणतो, "कोणाला मारणं खूप सोपं असतं साहेब, पण एकत्र आणणं खूप अवघड असतं. हिंदुत्वाला एकत्र आणा साहेब. कारण बाळासाहेबांच्या नंतर त्यांची सावली राजसाहेबांमध्ये बघितली जाते. इथे जमलेल्या माझ्या तमाम, हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं ऐकल्यावर अंगावर काटे उभे राहतात साहेब. तुम्ही हिंदुत्वासाठी बोला साहेब. प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये मराठी भाषा बोलली आणि शिकवलीच पाहिजे. पण गोरगरीबांना मारून त्यांना जबरदस्ती करून तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करत आहात साहेब. ते पण आपले हिंदू बांधव आहेत. जे हिंदू बांधव तुम्हाला आशेने बघायचे ते तुमच्यापासून लांब जात आहेत". 

"राजकारण करा साहेब...पण तुम्ही ते कोणासोबत करत आहात. ज्या लोकांनी बाळासाहेबांचा मान ठेवला नाही त्यांच्यासोबत तुम्ही आज युती करून बसलात साहेब. जी बाई बाळासाहेबांना थेरडा बोलली होती. ते लोक आज ज्या पक्षात आहेत त्यांच्यासोबत तुम्ही जाणार. श्रीरामाबद्दल जे चुकीचे बोलले त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार? हा हिंदू समाज खूप अपेक्षेने बघतो तुमच्यावर विश्वास ठेवतो, त्यांचा विश्वास तोडू नका. काही शिवसैनिकांना मी बोलतोय ते वाईट वाटेल, पण तुम्ही बाळासाहेबांची भाषणं नीट ऐका. मी पण बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. साहेब तुमच्यावर संपूर्ण हिंदू समाज प्रेम करतो आणि करत राहील. फक्त जे गोरगरीब आहेत आणि जे बाहेरच्या राज्यातून आले आहेत. प्लीज त्यांना मारू नका. दोन पैसे कमवायला आलेत. त्यांना मारू नका. जय महाराष्ट्र साहेब", असंही पुढे त्याने म्हटलं आहे. 

Web Title: hindustani bhau opposed mns action appealed raj thackeray said please dont beat them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.