हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रभाव पाडायचा आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 18:15 IST2016-07-18T12:45:22+5:302016-07-18T18:15:22+5:30
अतुल परचुरेने यम है हम, आर.के. लक्ष्मण की दुनिया यांसारख्या अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कपिल शर्मा या ...

हिंदी इंडस्ट्रीमध्ये प्रभाव पाडायचा आहे
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अतुल परचुरेने यम है हम, आर.के. लक्ष्मण की दुनिया यांसारख्या अनेक मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कपिल शर्मा या कार्यक्रमातही तो झळकला आहे. तसेच अनेक हिंदी चित्रपटातही त्याने काम केले आहे. हिंदीत इतके काम केल्यानंतरही अजूनही मला हिंदी इंडस्ट्रीत माझा प्रभाव पाडायचा आहे असे अतुल परचुरे सांगत आहे. अतुलने आपल्या आजवरच्या करियरविषयी सीएनएक्ससोबत मारलेल्या गप्पा...
हिंदी मालिकांमध्ये तू आज खूप चांगल्या भूमिका साकारत आहेस, अनेक हिंदी चित्रपटांमध्येही तू काम केले आहेस. मराठी नाटकात काम करत असताना तुझा हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश कसा झाला?
1998 साली मी चिकलेट या चिंगमची जाहिरात केली होती. ती जाहिरात माझ्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला असे म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. या जाहिरातीनंतर हिंदी इंडस्ट्रीत माझा खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला. मी फिर भी दिल है हिंदुस्तानी या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर माझे करियर संपूर्णपणे बदलले असे मला वाटते.
खूपच कमी कलाकार हिंदी इंडस्ट्रीत अनेक वर्षं टिकून राहू शकतात. आज तू अनेक वर्षं या इंडस्ट्रीत टिकून आहेस, त्याचे कारण काय वाटते?
हिंदीत टिकायचे असेल तर त्यांची भाषा तुम्हाला आली पाहिजे असे मला वाटते. मराठीमिश्रीत हिंदी बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे हिंदीत काम करायचा असा मी ज्यावेळी विचार केला, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा हिंदी या भाषेवर खूप मेहनत घेतली. मी हिंदी सुधारण्यासाठी त्याकाळी हिंदी मालिका बघण्याऐवजी, त्या ऐकत असे. याचमुळे हिंदी भाषेची माझ्या मनात असलेली भीती संपूर्णपणे गेली. त्यात राजा का बाजा या मालिकेच्यावेळी मिराज जैदी या लेखकासोबत मी जवळजवळ दोन-तीन वर्षं राहात होतो. त्यांच्यामुळे माझे हिंदी उच्चार अधिक सुधारले. तसेच तुम्ही काळानुसार बदललात तरच तुम्ही टिकाल असे माझे मत आहे. मी काळानुसार बदलत गेलो आणि त्यामुळेच आजही मी टिकून आहे असे मला वाटते. पण इतकी वर्षं हिंदी इंडस्ट्रीत असलो तरी म्हणावा तितका प्रभाव मला आजही पाडता आलेला नाहीये. अजून मला खूप काही मिळवायचे आहे.
तू देशाबाहेर स्टँड अप शो करतोस, प्रेक्षकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाची संकल्पना काय आहे?
मी तीन तासांचा एक स्टँडअप कॉमेडी शो परदेशात करतो, यात मी दीड तास सामान्य माणूस या थिमवर एक कार्यक्रम सादर करतो तर उरलेल्या दीड तासात या इंडस्ट्रीमधले माझे अनुभव लोकांसोबत शेअर करतो, या कार्यक्रमाला मला खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. सगळ्याच वयोगटातील लोक माझ्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवतात.
तू रंगभूमीवरून तुझ्या कारकिर्दीला सुरुवात केली आहेस, पण कित्येक वर्षं तू रंगभूमीवर झळकला नाहीस, याचे कारण काय?
नाटकात काम करायचे म्हणजे तुमच्याकडे खूप वेळ पाहिजे. सध्या मी मालिकांमध्ये व्यग्र असल्याने रंगभूमीला द्यायला माझ्याकडे तितकासा वेळ नाहीये. काही वर्षांपूर्वी नाटकांची तालीम ही तीन-साडे तीन महिने सुरू असायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. सध्या केवळ काही दिवसांत तालीम केली जाते. पण तरीही नाटकांच्या दौऱ्यांसाठी वेळ हा द्यावाच लागतो. त्यामुळे छोट्या पडद्यावरून वेळ मिळाल्यास नाटक करण्याचा माझा विचार आहे.
आजच्या छोट्या पडद्याविषयी तुझे मत काय आहे?
छोट्या पडद्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते. तुम्हाला खूप जास्त प्रसिद्धी मिळते, काम करण्याचे समाधान मिळते असे माझे वैयक्तिक मत आहे. मालिका या प्रेक्षकांच्या नेहमीच स्मरणात राहात नाहीत असे म्हटले जाते. पण त्यातही एखादी मालिका चांगली असेल तर ती मालिका, त्यातील भूमिका प्रेक्षक नेहमीच स्मरणात ठेवतात असे मला वाटते. मी काही दिवसांपूर्वी परदेशात असताना काबूलमधील लोकांनी मला एअरपोर्टला ओळखले होते. त्यांना कॉमेडी नाईट विथ कपिलमधील माझी कॉमेडी आवडते असे त्यांनी मला सांगितले होते. अफगाणिस्तानातही आपल्याला लोक ओळखतात हा माझ्यासाठी एक आश्चर्याचा धक्का होता. सध्या मी मझाक मझाक में या कार्यक्रमात काम करत आहे. या कार्यक्रमात काही पाकिस्तानी कॉमेडीयनही आहेत. पाकिस्तानमधील लोकही माझ्या अभिनयावर प्रेम करतात असे त्यांनी मला काहीच दिवसांपूर्वी सांगितले. छोट्या पडद्यामुळे जगभरात तुम्हाला ओळखले जाते याचा मला नुकताच अनुभव आला आहे.
मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचा काही विचार आहे का?
मला चांगल्या मराठी चित्रपटांच्या ऑफर कित्येक वर्षांपासून आल्याच नाहीत. बहुधा मी हिंदीत व्यग्र असल्याने मी मराठी चित्रपट करणार नाही असा दिग्दर्शक, निर्मात्यांचा समज असावा. मराठीत चांगली भूमिका ऑफर झाल्यास माझी मराठीत काम करण्याची नक्कीच इच्छा आहे.
हिंदीत आज तू इतकी वर्षं काम करत आहेस, हिंदीत काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?
हिंदीत काम करताना मला कधी कुठल्याहीप्रकारचे दडपण कधीच जाणवले नाही. तुम्ही तुमचे काम चांगल्याप्रकारे करा असा मानणारा मी आहे. तुमचा अभिनय चांगला असेल तर त्याचे कौतुक केले जाते. हिंदीत वाईट वागणूक मिळते असे अनेकजण म्हणतात. पण मला हे अजिबात पटत नाही. आज हिंदीतले अनेक सहकलाकार माझे खूप चांगले मित्र आहेत. यम है हम ही मालिका संपून अनेक महिने झाले असले या मालिकेतला सहकलाकार मानव गोहिल आणि मी आजही भेटतो. आमची खूप चांगली मैत्री आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांसोबतही मी काम केले आहे. या सगळ्यांसोबतच काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.