गुरमित-देबिनाच्या घरी झाली चोरी, नोकरानेच मारला डल्ला; नुकतेच शिफ्ट झाले होते नव्या घरात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:55 IST2025-06-04T09:54:49+5:302025-06-04T09:55:15+5:30
गुरमीतने स्वतः त्याच्या सोशल मीडियावरुन या घटनेची माहिती दिली. तसेच अभिनेत्याने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

गुरमित-देबिनाच्या घरी झाली चोरी, नोकरानेच मारला डल्ला; नुकतेच शिफ्ट झाले होते नव्या घरात!
Gurmeet Choudhary And Debina Bonnerjee House Robbed: गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक आहेत. चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडते. नुकतंच हे जोडपं त्याच्या नव्या घरात शिफ्ट झालं आहे. पण, नव्या घरात जाताच त्यांच्याकडे चोरीची घटना घडली. गुरमीत आणि देबिना यांच्या नव्या घरात चोरी झाली आहे. ही चोरी नोकराने केली आहे. मौल्यवान वस्तू घेऊन नोकराने पळ काढला. गुरमीतने स्वतः त्याच्या सोशल मीडियावरुन या घटनेची माहिती दिली. तसेच अभिनेत्याने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गुरमीतने इंस्टाग्रामवर पोस्ट करत या घटनेचा खुलासा केला. त्याने लिहिलं, "अलर्ट... आज आमच्या घरातील नवीन नोकर काही सामान घेऊन पळून गेला. सुदैवाने, आम्ही नेहमी आमच्या घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य प्रकारे पडताळणी करतो. त्यामुळे काही चूक झाल्यास त्वरित कारवाई करता येते. मी सुदैवाने घरी होतो आणि माझी मुलं त्यांच्या खोलीत सुरक्षित होती. काही फोन कॉल्स आणि जलद कारवाईमुळे आम्ही चोरी गेलेल्या बहुतेक वस्तू परत मिळवल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत".
या घटनेनंतर गुरमीतने आपल्या चाहत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला. त्याने लिहिले, "नेहमी सतर्क रहा. कोणालाही घरी कामासाठी ठेवताना त्याची पार्श्वभूमी नीट तपासून घ्या. हे थोडंसं दुर्दैवी असलं तरी हा एक मोठा धडा आहे".
२०१२ साली आलेल्या टीव्हीवरील 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या भूमिकेत दिसलेले गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आणि देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee). या मालिकेने त्यांना खूप लोकप्रियता दिली. नंतर दोघांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यांना दोन गोंडस मुली आहेत. हे लोकप्रिय जोडपं बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. दोघेही लवकरच कलर्स टीव्हीच्या नवीन रिअॅलिटी शो 'पती पत्नी और पंगा' मध्ये दिसणार आहेत. 'नच बलिये' नंतर त्यांना पुन्हा पडद्यावर एकत्र पाहणे ही दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे.