मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर आजही ठाम, गीतांजली कुलकर्णींनी सांगितलं कारण; तर पर्ण म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:36 IST2025-12-08T11:35:57+5:302025-12-08T11:36:14+5:30
मूल होऊ द्यायचा नाही हा निर्णय का घेतला? गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या...

मूल होऊ न देण्याच्या निर्णयावर आजही ठाम, गीतांजली कुलकर्णींनी सांगितलं कारण; तर पर्ण म्हणाली...
आजकाल अनेक जोडपं मुद्दामून मूल न होण्याचा निर्णय घेतात. असे अनेक मराठी सेलिब्रिटी आहेत जे वयाच्या चाळीशीतही आई वडील झालेले नाहीत. काहींनी हा निर्णय विचारपूर्वकही घेतलेला असतो. अतुल कुलकर्णी आणि गीतांजली कुलकर्णी ही मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. दोघांच्या उत्कृष्ट कामाचं नेहमीच कौतुक होतं. तर दुसरीकडे पर्ण पेठे आणि अलोक राजवाडे ही तरुणांमधली लोकप्रिय जोडी आहे. गीतांजली आणि पर्ण पेठे यांनी नुकतंच मुलाखतीत कुटुंबविस्तारावर आपलं मत मांडलं आहे.
'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या, "आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. मला ३१ व्या वर्षी आपला निर्णय चुकला की काय अशी भीती वाटली होती . पण आज मला अजिबातच वाईट वाटत नाही. उलट मला वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या. आपलं मूल असेल की मग साहजिकच त्याच्याकडेच लक्ष द्यावं लागतं. पण आज मी कित्येक गरजू मुलांना मदत करु शकते. कारण माझ्याकडे तो वेळ आहे, तसा माइंड स्पेस आहे. त्यामुळे माझा उपयोग होतोय असं मला वाटतं. मुलांच्या पालनपोषणाचा जो आनंद आहे तो मला मिळतोय. त्यामुळे त्यातच मी आनंदी आहे."
तर पर्ण पेठे म्हणाली, "याबाबतीत माझं अजूनही काहीच ठाम मत नाहीये. कारण मी अशा वयात आहे ज्यात मी त्याची पूर्ण स्पष्टता आलेली नाही. मला लहान मुलं खूप आवडतात. जर आम्ही मूल जन्माला घालायचा निर्णय घेतला तर तेही मी खूप प्रेमाने आणि छान करेन. आतापर्यंत तो निर्णय घेतला नाही त्याची त्याची काही कारणं आहेत. पण त्याबद्दल माझं काही ठाम मत सांगता येणार नाही. स्वत:चंच मूल असलं पाहिजे की नाही, त्याबद्दल जे मतमतांतर आहेत त्यावर मी सध्या विचार करण्याच्याच प्रक्रियेत आहे. तसंच आजकाल कुटुंबाचा विस्तार वेगळ्या पद्धतीनेही झाला आहे. आपला मित्रपरिवार इतका मोठा असतो, इंडस्ट्रीतले आमचे इतके मित्र मैत्रिणी आहेत जी सतत आपल्यासोबत आहेतच. ही पण एक विचार करायला लावणारीच गोष्ट आहे."