Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:56 IST2025-11-18T14:55:05+5:302025-11-18T14:56:20+5:30
'बिग बॉस' फेम आणि मराठी अभिनेता शिव ठाकरेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवच्या मुंबईतील घराला आग लागली आहे. या आगीत शिव ठाकरेचं घर अख्खं जळून खाक झाल्याचं दिसत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Video: शिव ठाकरेच्या मुंबईतील फ्लॅटला आग! अख्खं घर जळून खाक, अभिनेता थोडक्यात बचावला
'बिग बॉस' फेम आणि मराठी अभिनेता शिव ठाकरेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवच्या मुंबईतील घराला आग लागली आहे. या आगीत शिव ठाकरेचं घर अख्खं जळून खाक झाल्याचं दिसत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत शिव ठाकरेच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे.
विरल भय्यानी या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरुन शिव ठाकरेच्या घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आलं आहे. मुंबईतील कोलते पाटील वेर्वे बिल्डिंगमध्ये शिव ठाकरेचा फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये आग लागली. या आगीने घरातील वस्तू भक्ष्यस्थानी केल्याचं दिसत आहे. शिव ठाकरेच्या घराचं या आगीत मोठं नुकसान झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्याच्या बिल्डिंगच्या बाहेर अग्निशमन दलाची गाडीही उभी असल्याचं पाहायला मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा शिव ठाकरे घरी नव्हता, अशी माहिती मिळत आहे. त्याच्या टीमकडून याबाबत माहिती देण्यात आली असून यामध्ये अभिनेत्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचं म्हटलं आहे.
शिव ठाकरे हा टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. शिवने अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला. 'रोडिज'मधून त्याला लोकप्रियता मिळाली. तर 'बिग बॉस मराठी २'चा विजेता झाल्यानंतर शिव प्रसिद्धीझोतात आला होता. शिवने 'बिग बॉस हिंदी' आणि 'खतरों के खिलाडी'मध्येही सहभाग घेतला होता.