"प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो", तेजश्री प्रधानला 'राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार' प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 09:15 IST2025-12-05T09:14:49+5:302025-12-05T09:15:26+5:30
Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान हिने नुकतेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक खास बातमी सांगितली आहे.

"प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो", तेजश्री प्रधानला 'राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार' प्रदान
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. सध्या तेजश्री झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतील ही तुटेना या मालिकेत काम करताना दिसते आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक खास बातमी दिली आहे. तेजश्रीला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने 'राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४' ने सन्मानित केले आहे. या सन्मानाबद्दल अभिनेत्रीने महाराष्ट्र शासनाचे आणि सांस्कृतिक कार्य मंत्री, माननीय ॲड. आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले आहेत.
तेजश्री प्रधान हिने राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार स्वीकारतानाचे मंचावरील फोटो शेअर केले आणि लिहिले की, ''आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे!!! यशासकट अन् अपयशासकट.. न थकता.. न डगमगता.. उरी विश्वास बाळगून.. की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो! ते सर्व वेचत चालत राहणे. आणि मग, एक छानसा विसावा.. त्यात थोडा आढावा! करून ठेवलेल्या गोष्टींचा.. चुकलेल्याचा.. बरोबर गोष्टींचा.. मायबाप प्रेक्षकाच्या प्रेमाचा.. टिकेचा …आपुलकी दाखवणाऱ्या सहकलाकारांचा.. हितचिंतकांचा आणि निंदकांचा…''
तिने पुढे म्हटले की, मग, अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं, ''आमचं लक्ष आहे.. तुमच्या वाटचालीवर आणि मग, मन पुन्हा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं.. पुन्हा एकदा!! ह्या वेळी हे कोणीतरी फार महत्वाचं आहे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासासाठी…महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४ महाराष्ट्र शासनाचे आणि माननीय मंत्री, सांस्कृतिक कार्य, माननीय अॅड. आशिष शेलार यांचे खूप खूप आभार या केलेल्या सन्मानासाठी.''
वर्कफ्रंट
तेजश्री प्रधान या मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने होणार सून मी ह्या घरची, अग्गंबाई सासूबाई आणि अग्गंबाई सूनबाई, लेक लाडकी ह्या घरची आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम केले आहे. तिने झेंडा, शर्यत, ती सध्या काय करते, लग्न पाहावे करुन, पंचक, हॅशटॅग तदैव लग्नम या सिनेमात काम केले आहे. कार्टी काळजात घुसली, तिला काही सांगायचंय या नाटकात तिने काम केलंय.