"कामात राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच..", अश्विनीचं गृहस्वप्न साकार, दाखवली घराची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 17:35 IST2024-01-22T17:35:09+5:302024-01-22T17:35:34+5:30
Ashvini Mahangade : अश्विनी महांगडे हिचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार झाले असून नुकतेच तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे. आता तिने सोशल मीडियावर घराची झलक दाखवली आहे.

"कामात राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच..", अश्विनीचं गृहस्वप्न साकार, दाखवली घराची झलक
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत अनघाची भूमिका अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) हिने साकारली आहे. नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न साकार झाले असून नुकतेच तिला म्हाडाच्या घराची चावी मिळाली आहे. आता तिने सोशल मीडियावर घराची झलक दाखवली आहे.
अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर तिच्या घराची झलक दाखवली आहे. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, निलेश जगदाळे आणि मी मिळून हे स्वप्न पूर्ण केले. आपल्या कामात #राम शोधला की स्वप्नं पूर्ण होतातच. अर्थात स्वप्नं एकाचं असलं तरी त्यासाठी बळ देणारे हात फार महत्त्वाचे असतात.
या स्वप्नासाठी आम्हाला कोणत्या न कोणत्या कारणाने मदत करणाऱ्या सगळ्यांचेच आम्ही ऋणी आहोत.
तिने पुढे म्हटले की, पहिल्या पायरीपासून ते २१ मजले हा प्रवास तसा काही मिनिटांचा आहे पण आम्हाला खूप वेळ लागला. चांगले - वाईट, सुख - दुःख असे सगळेच सोबत घेवून पुढे आलो आणि हे एक स्वप्न पूर्ण करू शकलो. माझी लकी चार्म सारू.
वर्कफ्रंट...
अश्विनी महांगडेने 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. या मालिकेशिवाय तिने बॉईज चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली. मात्र झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेत अश्विनी दिसली होती. तिने टपाल, बॉईज, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना पाहायला मिळते.