दारू नाही, सिगरेट नाही तरीही दीपिका कक्करला कसा झाला कर्करोग? अभिनेत्रीने उघड केले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:12 IST2025-11-07T14:55:45+5:302025-11-07T15:12:44+5:30
दीपिका आणि शोएब टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी आहे. त्या दोघांना रुहान नावाचा मुलगा आहे.

दारू नाही, सिगरेट नाही तरीही दीपिका कक्करला कसा झाला कर्करोग? अभिनेत्रीने उघड केले कारण
'ससुराल सिमर का' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करला काही महिन्यांपूर्वीच स्टेज २ लिव्हर कॅन्सरचं निदान झालं. दीपिकाच्या लिव्हरमध्येमध्ये टेनिस बॉलएवढा ट्युमर असल्याचं निदान करण्यात आलं होतं. त्यामुळे तिची सर्जरीही करण्यात आली. तेव्हापासून दीपिका कॅन्सरशी लढा देत असून त्यावर उपचार घेत आहे. त्यामुळे दीपिका इंडस्ट्रीपासूनही दूर आहे. दीपिकानं नुकतंच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये स्वतःच्या आजाराबद्दल सविस्तर सांगितलं.
दीपिका कक्करने तिच्या वैद्यकीय स्थितीबद्दल बोलताना एक मोठा खुलासा केला. दीपिकाने सांगितलं, "नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात माझा FAPI टेस्ट आहे. या टेस्टमधून शरीरात कॅन्सर आहे की नाही आणि तो किती पसरला आहे हे कळतं. माझा नवरा शोएब इब्राहिम नसल्याशिवाय मी कोणताही टेस्ट करवू शकत नाही. रिपोर्टची वाट पाहणं हे खूपच भयानक असतं".
तिने पुढे सांगितलं, "माझा कॅन्सर फक्त ट्युमरमध्ये होता. लिव्हरचं २२ टक्के भाग काढून टाकण्यात आलe. म्हणजे जवळपास ११ सें.मी.चा मोठा तुकडा. ट्युमर आणि कॅन्सर दोन्ही बाहेर आले. सध्या मी ओरल टार्गेटेड थेरपीवर आहे.जी केमोथेरपीसारखीच आहे आणि पुढील दोन वर्षे सुरू राहील".
"ना ड्रिंक, ना स्मोक, तरीही कॅन्सर कसा झाला?"
हर्ष लिंबाचियाने जेव्हा तिला विचारलं की, "तू ना स्मोक करतेस ना मद्यपान करतेस, मग तुला कॅन्सर कसा झाला?". त्यावर दीपिका म्हणाली, "माझे डॉक्टर सांगतात की याचं नेमकं कारण सांगता येत नाही. काहीतरी टॉक्सिक गोष्ट शरीरात गेली असावी. मी कधी दारू प्यायली नाही, कधी सिगारेटही ओढली नाही. कधी कधी बाहेरचं जेवण खाते. पण असं काहीही केलं नाही, ज्यामुळे हा आजार व्हावा. कधी कधी गोष्टी व्हायच्या असतात, त्या होतातच".
दीपिकाने सांगितलं, "गॉल ब्लॅडरचं दुखणं होतं, पण ते मी प्रेग्नन्सीशी जोडून पाहत होते. डॉक्टर म्हणाले एसिडिटी असेल, दहा दिवस औषधं घेतली आणि विसरले. पण नंतर दुखणं वाढत गेलं. शेवटी टेस्ट केली आणि तेव्हा लक्षात आलं की हा विषय गंभीर आहे. दीपिका म्हणाली, "शोएबच्या आणि अल्लाहच्या आशीर्वादाने मी ही लढाई जिंकतेय. अजून प्रवास बाकी आहे, पण मी हिम्मत सोडणार नाही". दीपिका आणि शोएब टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडी आहे. त्या दोघांना रुहान नावाचा मुलगा आहे. या आधी टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खानला कॅन्सरचं निदान झालं होतं. सध्या तिच्यावरही उपचार सुरु आहेत.