'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये झळकलेल्या या चिमुरडीला ओळखलंत का?, याच शोमध्ये दिसणार नव्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 14:18 IST2021-06-24T14:17:07+5:302021-06-24T14:18:27+5:30
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमधील काही बालकलाकार आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये झळकलेल्या या चिमुरडीला ओळखलंत का?, याच शोमध्ये दिसणार नव्या भूमिकेत
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या शोमध्ये सहभागी झालेल्या छोट्या कलाकारांनी आपल्या गायन कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप उमटविली होती. त्यातील काही बालकलाकार आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. त्यातीलच एक बालकलाकार म्हणजे गायिका आर्या आंबेकर.आर्या आंबेकर १२ वर्षांपूर्वी सारेगमप लिटिल चॅम्प्समध्ये झळकली होती. या शोमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आता तर ती मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीदेखील आहे. विशेष बाब म्हणजे, सारेगमप लिटिल चॅम्प्समधील स्पर्धक आर्या आंबेकर आता याच शोमध्ये एक मार्गदर्शक म्हणून पहायला मिळणार आहे.
आर्या आंबेकरने इंस्टाग्रामवर स्वतःचे फोटो शेअर करत लिहिले की, नमस्कार...आजपासून सारेगमप लिटिल चॅम्पस् चं नवीन पर्व सुरू होतंय. त्या निमित्त ही पोस्ट.आपणा सर्वांना माहितच आहे, १२ वर्षांपूर्वी झी मराठी सारेगमप लिटिल चॅम्पस् मध्ये मी एक स्पर्धक होते. ह्याच स्पर्धेमुळे मी "संगीत" हे करिअर म्हणून निवडलं. माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. आणि आजही मी ह्याच मार्गावरून पुढे जात, संगीत क्षेत्रात काहीतरी विशेष करून दाखविण्याचं ध्येय बाळगून आहे.
आर्याने पुढे म्हटले की, १२ वर्षानंतरही झी मराठी आणि लिटिल चॅम्प्स ह्यांना माझ्या हृदयात तेच अढळ स्थान आहे. मात्र यावेळी माझी भूमिका बदलली आहे.
ह्या बदललेल्या भूमिकेत छोट्या स्पर्धकांची मैत्रीण, त्यांची एक मार्गदर्शक, त्यांची ताई म्हणून काम करायला मला खूप आनंद होतोय!!
आजपर्यंत स्पर्धक म्हणून असो, गायिका असो, अभिनेत्री असो, तुम्ही माझ्या कलेला प्रेमाने स्वीकारलंत, माझ्या पाठीशी उभे राहिलात, पुन्हा पुन्हा मला प्रोत्साहन दिलंत.ह्या नव्या भूमिकेसाठीही आपल्या सदिच्छा, आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील अशी आशा करते. झी मराठी लिटिल चॅम्पस् चं हे नवीन पर्व पाहायला विसरू नका. गुरुवार ते शनिवारी रात्री ९.३० वाजता, असे या पोस्टमध्ये आर्याने म्हटले.