'देवमाणूस २' मालिकेतील सलोनीला ओळखलंत का? जाणून घ्या तिच्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 16:07 IST2021-12-21T16:06:47+5:302021-12-21T16:07:21+5:30
'देवमाणूस २' (Devmanus 2) मालिकेतील नटवरसिंग सोबत असलेली सलोनी नेमकी कोण आहे?

'देवमाणूस २' मालिकेतील सलोनीला ओळखलंत का? जाणून घ्या तिच्याबद्दल
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका देवमाणूसचा (Devmanus) पुढचा भाग नुकताच भेटीला आला आहे. दुसऱ्या भागात (Devmanus 2) प्रेक्षकांना पहिल्या भागातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. या मालिकेत सलोनी नावाचे पात्र दाखवण्यात आले आहे. सलोनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने याआधी हिंदी मालिकेत काम केले आहे.
देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो आणि तो इतके दिवस कुठे गायब असतो याचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. मात्र अजितकुमार देव राजस्थानमध्ये जाऊन आणखी कोणती कटकारस्थान रचत असतो हे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. राजस्थान येथील जैसलमेर या ठिकाणी कथानकाला अनुसरून मालिकेचे काही शूटिंग करण्यात आले आहे. अजितकुमार सध्या वेश बदलून नटवर सिंगच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. नटवरसिंग सोबत असलेली सलोनी नेमकी कोण आहे आणि ती त्याची साथ कशी देते याचाही उलगडा मालिकेतून लवकरच होणार आहे.
डॉ. अजितकुमार देवला म्हणजेच नटवरसिंगला साथ देणारी सलोनीची अभिनेत्री प्रिया गौतम हिने भूमिका निभावली आहे. प्रिया गौतम ही मूळची जयपूर, राजस्थानची. मॉडेलिंग आणि अभिनेत्री क्षेत्रात प्रिया आपली स्वतःची ओळख बनवू पाहत आहे.
देवमाणूस२ ही तिची पहिली मराठी मालिका आहे. याआधी तिने सपना मॅटच्या जाहीरातीमध्ये आणि साड्यांच्या ब्रॅण्डसाठी मॉडेलिंग म्हणून काम केले आहे. सोनी टीव्हीवरील मेरे साई श्रद्धा और सबुरी या हिंदी मालिकेत तिने काम केले होते.