Corona Virus Effect: कोरोनाचा फटका बसला नव्या मालिकेला, टेलिकास्ट लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 16:28 IST2020-03-16T16:27:55+5:302020-03-16T16:28:30+5:30
आज प्रसारीत होणाऱ्या मालिकेचे प्रसारण कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.

Corona Virus Effect: कोरोनाचा फटका बसला नव्या मालिकेला, टेलिकास्ट लांबणीवर
सिनेइंडस्ट्रीवर कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतोय. मालिका, चित्रपट, वेबसीरिज सगळ्यांचे शूटींग काही दिवस रद्द करण्यात आले आहे. अनेक चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता तर पापाराझींनीही सुट्टीची घोषणा केली आहे. त्यात आता स्टार प्लस वाहिनीवर आज दाखल होणारी नविन मालिका 'अनुपमा'चे प्रसारण पुढे ढकललं आहे.
स्टार प्लसवरील नवीन मालिका अनुपमा ही १६ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती पण तारीख बदलण्यात आली आहे. कोरोना व्हायरसपासून संपूर्ण टीमचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नेटवर्कने ती तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका स्टार जल्शा वरील बंगाली मालिका श्रीमोयी याचा हिंदी रिमेक आहे.
मॅजिक मोमेंट्स या मालिकेचे निर्माते असून, ही लीना गंगोपाध्याय यांनी लिहिलेली कथा आहे. अनुपमा हा त्याचा हिंदी रिमेक असणार आहे आणि ये रिश्ता क्या केहलाता है व ये रिश्ते है प्यार केचे निर्माते राजन शाही या मालिकेचे निर्माते असणार आहेत. अनुपमाच्या भूमिकेसाठी लोकप्रिय कलाकार रुपाली गांगुली हिची निवड झालेली असून तिच्या नवऱ्याची भूमिका सुधांशु पांडे हा हुन्नरी कलाकार साकारणार आहे.
याबद्दल बोलताना रुपाली गांगुली म्हणाली, " अनुपमा ही अशी मालिका आहे जी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे.पण सध्याच्या आपल्या देशात झालेल्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे मालिकेचे प्रसारण लांबणीवर टाकणे हा योग्य निर्णय आहे. हा प्रोजेक्ट आमच्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे आणि मालिकेचे प्रसारण लांबणीवर टाकणे खूप मोठा निर्णय आहे. मी अनुपमाकडे प्रेक्षकांच्या नजरेतून पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आले की मालिकेचा प्रत्येक शॉट खूपच सुंदररीत्या सादर केलेला आहे आणि त्यांच्या मनाला भिडणारा आहे. या मालिकेचा भाग असणे आणि सर्वांकडून एवढे प्रेम मिळणे भाग्याचे आहे असे मी समजते. या काळात आपण सर्वच सुरक्षित आणि सावध राहू अशी अपेक्षा."
त्यामुळे स्टार प्लस आजपासून म्हणजेच १६ मार्च २०२० पासून रात्री ९.०० ते १०.०० 'ये रिश्ता क्या कहलाता है'चे मोठे भाग दाखवणार आहे.