कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:24 IST2025-11-10T10:21:47+5:302025-11-10T10:24:15+5:30
अनेकदा अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकदा त्यांच्या कपड्यांवरुन लोक त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर वाईट कमेंट करताना दिसतात. आता पहिल्यांदाच मिसेस मुख्यमंत्र्यांनी कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे.

कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडिया आणि समाजकार्यात सक्रिय असल्याचं दिसतं. अनेक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी होताना दिसतात. पण, अनेकदा अमृता फडणवीस यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कित्येकदा त्यांच्या कपड्यांवरुन लोक त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर वाईट कमेंट करताना दिसतात. पण, असं असलं तरी अमृता मात्र या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून त्यांचं काम करताना दिसतात. आता पहिल्यांदाच मिसेस मुख्यमंत्र्यांनी कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे.
अमृता फडणवीसांनी नुकतीच 'कर्ली टेल्स' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "काही वेळा ट्रोलिंग झालं आहे. मला ट्रोलिंग करतात याचं वाईट वाटत नाही. पण, खरंच काही प्रोजेक्टसाठी आम्ही खरंच खूप मेहनत घेतली होती. बदल घडवण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि वेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित झालं. त्यावेळी मला वाईट वाटलं होतं. पण, तुम्ही पुढे जात राहिलं पाहिजे. या गोष्टींमुळे मागे जायचं की पुढे चालत राहायचं याचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. तुमच्या स्वप्नांबाबत तुम्हाला खात्री असली पाहिजे. तुम्ही तुमचं ध्येय सोडलं नाही पाहिजे".
देवेंद्र फडणवीसांची याबाबत काय प्रतिक्रिया असते, असं विचारल्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, "मी जेव्हा त्यांच्यासोबत या गोष्टी शेअर करते की मला हे करायचं होतं पण या गोष्टींवर लक्ष केंद्रीत झालं. तेव्हा त्यांची अशीच प्रतिक्रिया असते की तुम्ही हे चांगल्या पद्धतीने अजून कसं पोहोचवू शकता किंवा हे घडणार नाही, याची काळजी घ्या".