प्रेक्षकांना या प्रसिद्ध मालिकेची आठवण करून देणार चला हवा येऊ द्याची टीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 20:30 IST2018-11-20T20:30:00+5:302018-11-20T20:30:02+5:30
मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चला हवा हवा येऊ द्या मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही.

प्रेक्षकांना या प्रसिद्ध मालिकेची आठवण करून देणार चला हवा येऊ द्याची टीम
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षं झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. ४०० भागांनंतर आता या कार्यक्रमात नवीन काय असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असताना नुकतंच चला हवा येऊ द्याचे नवीन पर्व होऊ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आहे.
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम आता संपूर्ण आठवडा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहे. येत्या आगामी भागात थुकरटवाडीत झी मराठी प्रस्तुत नटसम्राट आणि आरण्यक या नाटकातील कलाकारांची फौज सज्ज होणार आहे. मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, दिलीप प्रभावळकर यांसारखे ज्येष्ठ कलाकार थुकरट वाडीत हजर असल्यावर त्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चला हवा हवा येऊ द्या मधील विनोदवीर दमदार स्किट सादर करणार यात शंकाच नाही. रोहिणी हट्टंगडी यांनी मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता या कार्यक्रमात थुकरट वाडीचा मुन्ना भाऊ एमबीबीएस विनोदवीर सादर करणार आहेत. यात भाऊ कदम मुन्ना भाऊ साकारणार आहे. तसंच श्रीयुत गंगाधर टिपरे ही अजरामर मालिका आजही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवते. खुद्द दिलीप प्रभावळकर थुकरट वाडीत असल्यावर त्यांच्यासमोर विनोदवीरांनी आबा टिपरे साकारले. निलेश साबळे यांनी आबा टिपरे तर श्रेया बुगडेने श्यामल साकारली.
हे सर्व विनोदवीर त्यांच्या अभिनय कौशल्याने आणि कॉमेडी टायमिंगने सर्व रसिक प्रेक्षकांना हसून लोटपोट करण्यासाठी संपूर्ण आठवडा सज्ज होणार आहेत.
प्रेक्षकांना ही सर्व धमाल १९ आणि २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.