"तुझं शेवटचं दर्शन घेऊ शकले नाही...", बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडल्या वर्षा उसगांवकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 16:49 IST2024-08-17T16:49:16+5:302024-08-17T16:49:59+5:30
Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'च्या घरात भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेले पाहायला मिळणार आहे.

"तुझं शेवटचं दर्शन घेऊ शकले नाही...", बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडल्या वर्षा उसगांवकर
'बिग बॉस मराठी'(Bigg Boss Marathi Season 5)च्या घरात भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेले पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉसने घरातील सदस्यांना एक जादुई फोन दिला. या फोनच्या मदतीने ते आपल्याला सोडून गेलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधू शकतात. शेवटचे काही सांगायचे राहिले असेल तर ते सांगू शकतात. स्पर्धकांनी आपल्या जवळच्या लोकांना फोन करून मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली. यावेळी वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांनी वडिलांना फोन लावला होता. त्यांच्याशी मनातील बोलताना त्या खूप भावुक झाल्या होत्या.
वर्षा उसगांवकर फोनवर बोलताना दिसल्या की, हॅलो पापा, कसा आहेस तू. चांगलाच असशील. आज तुझी खूप आठवण येतेय पापा. तू खूप मोठा माणूस होतास. २०२०मध्ये तुझं निधन झालं. शेवटचं दर्शनदेखील घेऊ शकले नाही. तेव्हा कोरोनाचं संकट अख्ख्या जगावर होतं. म्हणून शेवटचं तुझं दर्शन व्हिडीओद्वारे घेतले. तुझी खूप आठवण येते कारण आज मी बिग बॉसच्या घरात आहे. तिथे मला तू शिकवलेल्या प्रत्येक गोष्टींची आठवण होते आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, तू अतिशय शिस्तीने वागायचा. तू लवकर उठलं पाहिजे. हसलं नाही पाहिजे. जोरात बोललं नाही पाहिजे. तेव्हा मला तुझी खूप भीती वाटायची. तेव्हा मी कधीच व्यक्त होऊ शकले नाही. तुला सांगू शकले नाही की मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते. मला तुझा अभिमान आहे, गर्व आहे. तू अतिशय चांगला नेता होतास. तुझ्यावर खूप प्रेम करते. तू सदैव माझ्या पाठिशी आहेस, असं तुला मला सांगावसं वाटतं. धन्यवाद बिग बॉस.