Bigg Boss Marathi : अंतिम स्पर्धकांनी बाहेर पडल्यानंतर शेअर केले अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 10:50 IST2018-07-23T10:46:02+5:302018-07-23T10:50:01+5:30
मेघा धाडे ही ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली.

Bigg Boss Marathi : अंतिम स्पर्धकांनी बाहेर पडल्यानंतर शेअर केले अनुभव
Bigg Boss Marathi Finale : मराठी 'बिग बॉस'चे पहिले पर्व खूप गाजले. पहिल्या पर्वाच्या अंतिम सोहळ्यात सहा स्पर्धकांनी एन्ट्री केली. पुष्कर जोग, मेघा धाडे, स्मिता गोंदकर, सई लोकूर, आस्ताद काळे, शर्मिष्ठा राऊत महाअंतिम फेरीत टप्प्याटप्याने बाहेर पडले. मेघा धाडे आणि पुष्कर जोग यांच्यात अंतिम लढत पार पडली. पहिल्या आठवड्यापासूनच मेघा ही ट्रॉफीची प्रबळ दावेदार मानली जात होती. किंबहुना शो जिंकायचाच याच महत्त्वाकांक्षेने मेघा या घरात आली होती. सुरुवातीपासूनच या दूरदृष्टीने मेघाचा खेळ सुरू होता. ‘बिग बॉस’च्या १०० दिवसांच्या वास्तव्यात मेघावर अनेक आरोप झालेत. ती बडबडी आहे, ती खोटारडी आहे, ती अप्रामाणिक आहे, असे अनेक आरोप तिने झेलले. ज्या सई व पुष्कर या ‘बिग बॉस’च्या घरातील तिच्या सर्वाधिक जवळच्या मित्रांनीही तिच्यावर हे आरोप केलेत. पण मेघा या आरोपांना पुरून उरली आणि मेघा 'बिग बॉस ' मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली. पुष्कर जोग याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
बिग बॉसमधील अनुभवाबाबत सांगताना शर्मिष्ठा राऊत म्हणाली की, ''बिग बॉस 'च्या घरात राहणे सोपे नाही. इथे आल्यापासून मी कायमच स्वत:चा गेम खेळले. मेघा माझी चांगली मैत्रीण आहे. या घराने मला खूप काही शिकवले. घरात आले तेव्हा जिंकूनच बाहेर पडेन असे वाटले होते. '
तर पहिल्या तीन आठवड्यांमध्ये माझ्या वागण्यामूळे मी प्रेक्षकांचा रोष ओढावला होता. त्यामुळे टॉप पाचमध्ये असेन असे वाटले नव्हते, असे आस्ताद काळे म्हणाला व पुढे सांगितले की, ' या घराने माझ्यात खूप मोठा बदल घडवून आणला. काहीही बोलण्याआधी, कृती करण्याआधी दहा वेळा विचार करण्याची सवय या घरामुळे मला लागली. '
सईने सांगितले की 'या घराने मला मेघा व पुष्कर हे दोन मित्र दिले. घरात आले तेव्हा शंभर दिवस राहणार हा निर्धार करून आले होते. त्याप्रमाणे या घरात मी शंभर दिवस राहिले. '
पुष्करने आज तो या ठिकाणी केवळ आपल्या आई वडिलांमुळे असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या आई वडिलांचे आभार मानले व घरात येऊन कामे करायला शिकल्याचे त्याने सांगितले.