घटस्फोटावर भाष्य अन्...; विशाल कोटियनच्या 'त्या' कृत्यावर राकेश बापटचे कुटुंबीय संतापले, जारी केलं निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 17:49 IST2026-03-31T17:46:37+5:302026-03-31T17:49:12+5:30
विशालने वैयक्तिक गोष्टींवर बोलून मर्यादा ओलांडल्या…; राकेश बापटच्या कुटुंबाने व्यक्त केली नाराजी, विनंती करत म्हणाले...

घटस्फोटावर भाष्य अन्...; विशाल कोटियनच्या 'त्या' कृत्यावर राकेश बापटचे कुटुंबीय संतापले, जारी केलं निवेदन
Raqesh Bapat Family: 'बिग बॉस मराठी'चं यंदाचं पर्व सातत्याने चर्चेत आहे. घरातील सदस्यांमधील वाद, टास्कमधील त्यांची खेळी सगळ्याच गोष्टी चर्चेच्या विषय ठरत आहेत. आता हा शो ग्रॅंडफिनाले कडे वाटचाल करत आहे. शिवाय प्रत्येकजण आपापला स्वतंत्र गेम दाखवत आहे. अलिकडेच ३० मार्चला बिग बॉसच्या घराच नॉमिनेशन टास्क पार पडला. ज्यामध्ये विशाल आणि राकेश बापट यांच्यामध्ये मोठा वाद झाला. यावेळी विशालने राकेश यांच्या वैयक्तिक आयुष्याचा भाष्य केलं. त्यामुळे राकेश बापट देखील संतापला. या घडल्या प्रकारामुळे घरातील वातावरण अधिकच तापलं आणि काही क्षणातच हा वाद धक्काबुक्कीपर्यंत पोहोचला. विशाल थेट राकेश बापटच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
या प्रकरणी मनोरंजन विश्वातील बऱ्याच कलाकार मंडळींच्या प्रतिक्रिया समोर आल्या. दरम्यान, आता यावर राकेश बापट यांच्या कुटुंबियांनी निवेदन जारी करत प्रतिक्रिया दिली आहे. राकेशच्या कुटुंबियांनी विशालच्या त्या कृत्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राकेश बापटचे कुटुंबीय काय म्हणालेत?
सोशल मीडियाद्वारे आपलं निवेदन जारी करत राकेशच्या कुटुंबियांनी म्हटलंय,"आम्ही, राकेश बापट यांचे कुटुंबीय, बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक विशाल कोटियन यांच्याकडून अलीकडे घडलेल्या घटनेबाबत आणि त्यातून निर्माण झालेल्या कथनांबाबत आमची भूमिका स्पष्ट करू इच्छितो. विशाल यांनी इतर व्यक्तींच्या वैयक्तिक बाबींचा उल्लेख केला आहे, जो सर्व स्पर्धकांनी केलेल्या कराराचा स्पष्ट भंग आहे. त्यामुळे आम्ही याचा सार्वजनिकरीत्या तीव्र निषेध करीत आहोत."
पुढे त्यांनी म्हटलंय,"राकेश यांनी या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय पूर्ण विश्वासाने घेतला होता, विशेषतः शोचे सूत्रसंचालक श्री. रितेश देशमुख यांचा या शो मधील सहभागामुळे हा मंच सुसंस्कृत, आदरयुक्त आणि कुटुंबासोबत पाहण्यास योग्य राहील, असा त्यांचा विश्वास होता.संपूर्ण प्रवासात राकेश यांनी नेहमी संयम, सन्मान आणि प्रतिष्ठा राखली आहे. घराबाहेरील कोणत्याही वैयक्तिक वावींवरून त्यांनी कधीही कोणाचीही अवहेलना केलेली नाही.हे नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे की बिग बॉसच्या नियमानुसार आणि कायदेशीर करारानुसार, स्पर्धकांना घराबाहेरील वैयक्तिक बाबींवर चर्चा करणे किंवा त्यावरून कोणाला लक्ष्य करणे सक्त मनाई आहे. अशा प्रकारचे उल्लंघन झाल्यास गंभीर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शोमधून बाहेर काढण्याचाही समावेश आहे."
एक कुटुंब म्हणून आम्ही निराश आहोत...
"तथापि, विशाल कोटियन यांनी हा नियम वारंवार मोडला आहे. शोच्या सुरुवातीपासूनच हे सुरु असून, यावेळ हा प्रकार सर्व मर्यादा ओलांडणारा ठरला आहे. हा शोच्या आचारसहितेचा गंभीर आणि अस्वीकार्य भंग आहे.याहूनही अधिक चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार केवळ शब्दिक चिथावणीपुरता मर्यादित नव्हता. हेतूस्पर शारीरिक चिथावणी देण्यात आली, वैयक्तिक मर्यादा ओलांडण्यात आल्या आणि ही परिस्थिती कॅमेऱ्यासमोर शारीरिक आक्रमकतेपर्यंत पोहोचली, जे नियमांचे आणखी एक मोठे उल्लंघन आहे.शोमध्ये शारीरिक आक्रमकतेविरुद्ध किरकोळ कारवाई करण्यात आली असल्याचे आम्ही पाहिले आहे; मात्र इतर स्पर्धकांच्या वैयक्तिक बाबी उकरून काढण्याचा जो गंभीर कायदेशीर भंग झाला आहे, तो अद्याप दुर्लक्षित राहिला आहे.एक कुटुंब म्हणून आम्ही अत्यंत व्यथित आणि निराश आहोत. त्यांच्या चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे." असं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
रितेश देशमुखला विनंती करत म्हणाले...
"बिग बॉस मराठी, कलर्स आणि एंडेमॉलशाइन यांच्या प्रयन्नाचे आम्ही कौतुक करतो; मात्र महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांनी पाहिल्या जाणाऱ्या या लोकप्रिय शोची प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य उदाहरण घालून द्यावे, अशी आमची विनंती आहे.तसेच, शीचे सूत्रसंचालक श्री. रितेश देशमुख यांनी या सर्व उल्लंघनांची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आम्हाला अपेक्षा आहे."