'बिग बॉस मराठी'च्या वेळेत बदल; यंदा रात्री ८ वाजताच का उघडणार घराचं दार? समोर आलं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 13:40 IST2026-01-11T13:38:20+5:302026-01-11T13:40:16+5:30
'बिग बॉस मराठी ६'ची वेळ बदलण्याबाबत सतिश राजवाडे यांनी स्पष्ट केलं कारण

'बिग बॉस मराठी'च्या वेळेत बदल; यंदा रात्री ८ वाजताच का उघडणार घराचं दार? समोर आलं कारण
छोट्या पडद्यावरील सर्वात गाजलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा ग्रँड प्रीमियर आज, ११ जानेवारी रोजी पार पडणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये अनेक बदल करण्यात आले असून, सर्वात मोठा बदल म्हणजे शोच्या प्रसारणाची वेळ. रात्री ९ किंवा १० वाजता ऐवजी यंदा हा शो रात्री ८ वाजताच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेळेतील बदलाबाबत 'मराठी क्लस्टर'चे कार्यकारी उपाध्यक्ष सतिश राजवाडे यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
'लोकसत्ता ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सतिश राजवाडे म्हणाले, "यंदा शो लवकर प्रसारित करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की, लोकांना तो वेळेत पाहता यावा. अनेकदा प्रेक्षकांना 'खूप उशीर होतोय किंवा लवकर झोपायचे आहे' असे वाटून भाग चुकवावा लागतो. प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण मनोरंजनाचा आनंद घेता यावा, या हेतूने आम्ही रात्री ८ वाजताची वेळ निश्चित केली आहे".
यंदाच्या सीझनची थीम अधिक धारदार असणार असल्याचे संकेत राजवाडे यांनी दिले आहेत. ते पुढे म्हणाले, "यंदा घरात २१ ते ५५ वयोगटातील विविध विचारसरणीचे आणि स्वभावांचे स्पर्धक पाहायला मिळतील. फॉरमॅट तोच असला तरी कंटेंट अधिक चुरशीचा आणि चोखंदळ प्रेक्षकांच्या आवडीनुसार असणार आहे. रितेश देशमुख यांच्यासारखा ठाम आणि संवेदनशील सुपरस्टार पुन्हा एकदा या शोची धुरा सांभाळत असल्याने शोला वेगळी उंची मिळेल".
कुठे पाहता येणार?
'बिग बॉस मराठी'चा हा नवा सीझन 'कलर्स मराठी’' वाहिनीवर आणि डिजिटल प्लॅटफॉर्म 'जिओ हॉटस्टार'वर दररोज रात्री ८ वाजता प्रसारित केला जाईल. 'दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!' या टॅगलाईनमुळे यंदा स्पर्धकांचे नशीब कसे फिरणार, याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.