महाराष्ट्रात तुफान येणार! रितेश देशमुखच्या 'लयभारी' एन्ट्रीने ग्रँड प्रीमियरचा सोहळा रंगणार; कधी, कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 12:43 IST2026-01-10T12:37:55+5:302026-01-10T12:43:36+5:30
नवे पर्व,नवा खेळ अन् नवे चेहरे! घराघरात शिरणार महाराष्ट्राचं तुफान! ग्रँड प्रीमियरचा रंगतदार सोहळा रंगणार

महाराष्ट्रात तुफान येणार! रितेश देशमुखच्या 'लयभारी' एन्ट्रीने ग्रँड प्रीमियरचा सोहळा रंगणार; कधी, कुठे बघाल?
Bigg Boss Marathi 6: महाराष्ट्राचं तुफान उद्यापासून थेट घराघरात शिरणार आहे! प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ अखेर उद्यापासून सुरू होत आहे. या भव्य ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना पहिल्याच क्षणापासून भेटणार आहे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख. आपल्या खास स्टाइलमध्ये, विनोदाची फटकार आणि गरज पडल्यास कडक भूमिकेत दिसणारे रितेश देशमुख यंदाही बिग बॉसच्या घरातल्या खेळाला दिशा देणार आहेत. यासोबतच त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने ग्रँड प्रीमियरला मिळणार आहे जबरदस्त एनर्जी आणि ग्लॅमरची झलक, जी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. नवे पर्व, नवा खेळ आणि नवे चेहरे... 'बिग बॉस मराठी सीझन ६' ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर पाहता येणार आहे.
ग्रँड प्रीमियरपूर्वी प्रदर्शित झालेल्या सहभागींच्या अनरिव्हील प्रोमोनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. कुणी सौंदर्य आणि अदा घेऊन येणारं फूलनदेवी रूप, कुणी कातिल डान्स मूव्ह्जने घायाळ करणारी अदा, तर कुणी घरात धुमाकूळ घालणारी दमदार एन्ट्री या झलकांमधून अनेक नावांवर चर्चा रंगू लागली आहे. सोशल मीडियावर “हे सहभागी नेमके कोण?” असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात असून अंदाजांचे खेळ रंगले आहेत.
उद्या अखेर दार उघडणार आणि समजणार की ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा कोण-कोण प्रवेश करणार! नशिबाचा खेळ, डावपेचांची सुरुवात आणि तुफान मनोरंजन हे सगळं नक्की पहा. बिग बॉस मराठी सीझन ६, उद्यापासून रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर स्ट्रीम होणार आहे.