'बिग बॉस'मध्ये गेम फेल पण घराबाहेर मात्र फक्त आयुष संजीवचीच चर्चा, “तुरू तुरू” गाण्यात अभिनेत्रीसोबत रोमान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 19:02 IST2026-02-11T19:00:47+5:302026-02-11T19:02:01+5:30
आयुष संजीवचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आयुषचं “तुरु तुरू” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून यामध्ये आयुषसोबत अभिनेत्री हेमल इंगळे दिसत आहे.

'बिग बॉस'मध्ये गेम फेल पण घराबाहेर मात्र फक्त आयुष संजीवचीच चर्चा, “तुरू तुरू” गाण्यात अभिनेत्रीसोबत रोमान्स
Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पर्वात अभिनेता आयुष संजीव सहभागी झाला आहे. बिग बॉसच्या घरात आयुषचा फार गेम दिसत नसला तरी घराबाहेर मात्र आयुषचीच चर्चा सुरू आहे. आयुष संजीवचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आयुषचं “तुरु तुरू” हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून यामध्ये आयुषसोबत अभिनेत्री हेमल इंगळे दिसत आहे.
गायिका सई गोडबोलेच्या सुमधुर आवाजातील “तुरु तुरू” या गाण्याने फक्त दोन दिवसात १ मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. या गाण्याला सोशल मीडियावर लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या गाण्यात बिग बॉस फेम अभिनेता आयुष संजीव आणि अभिनेत्री हेमल इंगळे आहेत. तसेच गायिका सई गोडबोले व गायक निहार शेंबेकर आणि शार्क यांनी हे गाणं गायलं आहे. विकास साटम हे या गाण्याचे गीतकार आहेत. तेजस नेरुरकरच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार निहार शेंबेकर आणि शार्क यांनी संगीत दिलं आहे. पूजा काळेने या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
अभिनेत्री हेमल इंगळे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “मी साईरत्न एंटरटेनमेंटचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला या गाण्यात काम करण्याची संधी दिली. माझी प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही या गाण्याला भरभरून प्रेम द्या. या गाण्याचे दोन दिवसात एक मिलियन व्ह्यूज पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मी सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. या गाण्यावर सुंदर रील व्हिडिओ बनवा. आणि मला जरूर टॅग करा.”