हातावरचा टॅटू दिसला अन् चाहत्यांना कळलं स्पर्धकाचं नाव, प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:56 IST2026-01-09T14:56:12+5:302026-01-09T14:56:55+5:30
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात कोण सहभागी होणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

हातावरचा टॅटू दिसला अन् चाहत्यांना कळलं स्पर्धकाचं नाव, प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री कोण?
'बिग बॉस मराठी'चं सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. यंदाच्या पर्वात १६ हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. हे नवं पर्व सुरु होण्यास आता मोजकेच दिवस उरले असून स्पर्धकांबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ही उत्सुकता कलर्स मराठी वाहिनीने आणखी ताणली आहे. कलर्स मराठीकडून आपल्या अधिकृत सोशल मीडियावर 'बिग बॉस'मधील स्पर्धकांचे प्रोमो शेअर केले जात आहेत. त्यात स्पर्धकांचा चेहरा दिसून येत नाहीये. पण, प्रेक्षकांनीही फक्त प्रोमो पाहूनच ते स्पर्धक कोणते आहेत, याबद्दल शोध लावलाय.
नुकतंच कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये बोल्ड अंदाजात एक सौंदर्यवती येते. हिरव्या रंगाची साडी नेसलेल्या या सुंदरीच्या हातावर टॅटू असल्याचं पाहायला मिळालं. या टॅटूमुळे ही स्पर्धक कोण असल्याचं प्रेक्षकांनी आधीच ओळखलं आहे. या प्रोमोवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. यात जवळपास अनेकांनी ही दीपाली सय्यद असल्याचं म्हटलंय. "आपल्या नजरेने प्रेक्षकांच्या हृदयावर हल्ला करायला आणि घर गाजवायला येतेय ही सौंदर्याची फूलनदेवी!!!" असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
दिपाली सय्यदनं हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम करुन चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या ती राजकारणात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, 'बिग बॉस मराठी ६' हे नवं पर्व ११ जानेवारीपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांना 'बिग बॉस मराठी ६' पाहता येणार आहे. रितेशला पुन्हा एकदा भाऊच्या धक्क्यावर पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत.