"मला माहीत होतं मी बाहेर जाणारे...", 'बिग बॉस'च्या घरातून Exit घेतल्यावर आयुष संजीवचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:36 IST2026-02-17T11:35:20+5:302026-02-17T11:36:23+5:30
बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली. आता बाहेर आल्यावर याबाबत आयुषने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.

"मला माहीत होतं मी बाहेर जाणारे...", 'बिग बॉस'च्या घरातून Exit घेतल्यावर आयुष संजीवचं मोठं वक्तव्य
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली. डबल एव्हिक्शन झाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. गेल्या आठवड्यात आजारी असल्याने आयुष बिग बॉसच्या घरात फारसा दिसला नाही. त्यामुळे टास्कमध्येही त्याला सहभागी होता आलं नाही. आता बाहेर आल्यावर याबाबत आयुषने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
आयुष म्हणाला, "पहिल्या नॉमिनेशनला मला एवढं वाटलं नव्हतं. पण शेवटच्या आठवड्यात मला ते जाणवायला लागलं होतं. मला खूप अपराधी वाटत होतं. कारण आयुष्याच्या या टप्प्यावर असं झालं. आपल्याला काहीतरी करायचंय पण करूच शकत नाहीये. असं ते फिलिंग होतं. मी खेळू शकत नाहीये. मी टास्क करू शकत नाहीये. या सगळ्याचा आपण विचार केला की कळतं की आपण दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित प्रेक्षकांचा कल आपल्या साइडने राहणार नाही. म्हणजे मला हे जाणवत होतं की लोक पण किती वेळा व्होट करणार? व्होट करणाऱ्यांना पण मी काहीतरी दिलं पाहिजे ना...शेवटी हा नशिबाचा भाग आहे. बिग बॉसमध्ये जाणं पण नशीब होतं आणि जे काही घडलं तेही नशीब होतं. प्रत्येक गोष्टीच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू असतात. याचंही तसंच आहे".
"गेल्यावेळी शूटिंगमध्ये मला छोटी दुखापत झाली होती. तीच इंटरनल इन्ज्युरी पुन्हा टास्कमध्ये खूप चुकीच्या वेळी उद्भवली. हे फार अनपेक्षित होतं. असं होईल असं मला वाटलं नव्हतं. मी मेडिसिन घेत होतो. रिकव्हर होत होतो. पण मी कधीच इतका आजारी पडलो नव्हतो. इतकं कधी वेट लॉस झालं नव्हतं. त्यात एक गोष्ट खात होती की बाकीचे सगळे पुढे जात्यात. घरी आल्यानंतर मी जेव्हा एपिसोड पाहिले तेव्हा कळलं की मी खूपच आजारी दिसत होतो. माझं ७-८ किलो वजन कमी झालंय", असं आयुष म्हणाला.