ग्वाल्हेरमध्ये तान्या मित्तलचा आलिशान राजवाडा? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:45 IST2025-09-08T11:44:10+5:302025-09-08T11:45:48+5:30
तान्याच्या फॅन पेजवरून एका आलिशान घराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

ग्वाल्हेरमध्ये तान्या मित्तलचा आलिशान राजवाडा? व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ट्रोल
Tanya Mittal: 'बिग बॉस सीझन १९' ची स्पर्धक तान्या मित्तल तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत आहे. ती सतत तिच्या भव्यदिव्य आयुष्याबद्दल काहीना काही सांगत असते. जे ऐकून घरातील इतर स्पर्धक व प्रेक्षकही आश्चर्य व्यक्त करत असतात.
शोमध्ये तिने १५० बॉडीगार्ड आणि ७ स्टार हॉटेलपेक्षाही चांगले घर असल्याचा दावा केला होता. आता, एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दाखवण्यात आलेलं घर हे तान्या मित्तलचे असल्याचा दावा करण्यात आलाय.
सोशल मीडियावर तान्याच्या फॅन पेजवरून एका आलिशान घराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ग्वाल्हेरमधील तान्याचं घर असल्याचा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात आला होता. घराची भव्यता पाहून लोक थक्क झाले होते आणि तान्याच्या दाव्यावर विश्वास ठेवू लागले होते. पण, 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. अनेक नेटकऱ्यांनीही हा व्हिडीओ खोटा असल्याचे म्हटले आहे. एका यूजरने कमेंट केली, "अरे देवा. खोटे बोलण्याचीही एक मर्यादा असते. हा एक शाही राजवाडा आहे. लोक त्यावर विश्वासही ठेवत आहेत".
व्हायरल झालेल्या व्हिडीओतील हे घर ग्वाल्हेरमधील नाही. तर पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील गुलबर्ग ग्रीन्समध्ये असलेल्या एका शाही हवेलीचा आहे. काही युजर्सनी हा व्हिडीओ एका पाकिस्तानी रिअल इस्टेटच्या जाहिरातीमध्ये पाहिल्याचेही सांगितले. व्हिडीओमधील तथ्य समोर आल्यानंतर, अनेकजण याला 'पीआर स्टंट' म्हणत आहेत आणि तान्याला पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत.