तान्या मित्तलच्या आईवडिलांचे भावुक पत्र; म्हणाले "हात जोडून विनंती, यापासून आम्हाला दूर ठेवा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:10 IST2025-09-05T15:10:25+5:302025-09-05T15:10:45+5:30
तान्या मित्तलच्या आईवडिलांची हात जोडून विनंती, म्हणाले "वाटलं नव्हतं की असं होईल"

तान्या मित्तलच्या आईवडिलांचे भावुक पत्र; म्हणाले "हात जोडून विनंती, यापासून आम्हाला दूर ठेवा"
'बिग बॉस १९' ची स्पर्धक तान्या मित्तल सध्या तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर २.५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेली तान्या ही सतत ट्रोलिंग आणि नकारात्मकतेला सामोरे जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता तिच्या आई-वडिलांनी एक निवेदन जारी केले असून, तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.
तान्याच्या टीमनं तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या आई-वडिलांचं एक निवेदन शेअर केलं आहे. यात म्हटले आहे की, "देशातील सर्वात मोठ्या रिॲलिटी शोमध्ये आमची तान्या दिसतेय हे पाहून आम्ही अनुभवत असलेल्या भावना शब्दांत मांडणं कठीण आहे. पालक म्हणून, तिला लोकांची मनं जिंकताना पाहण्यापेक्षा अभिमानास्पद दुसरी कोणतीच गोष्ट नाही. पण त्याच वेळी, जे लोक तिला ओळखतही नाहीत, ते जेव्हा तिच्याबद्दल इतके क्रूरपणे बोलतात, तिला खाली पाडण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतात, ते पाहणं याहून वेदनादायी काहीही नाही".
त्यांनी पुढे म्हटले की, "जे कोणी तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत किंवा आरोप करत आहेत, त्यांना आमची एकच विनंती आहे. कृपया तिचा प्रवास पूर्ण होईपर्यंत वाट बघा आणि मगच तुमचे मत मांडा. ती तेवढ्या सन्मानाची नक्कीच हकदार आहे. तुमचे रील्स आणि आरोप तुम्हाला तात्पुरती प्रसिद्धी मिळवून देतील, पण ते कायमस्वरूपी जखमा देऊन जातील".
तान्याच्या पालकांनी विनंती केली की, "कृपया... आम्ही हात जोडून विनंती आहे की आम्हाला, तिच्या कुटुंबाला यापासून दूर ठेवा. हा आमच्यासाठी खूप कठीण काळ आहे. ज्या मुलीला आम्ही फक्त प्रेमाने वाढवले, तिला अशा सार्वजनिक व्यासपीठावर अशा नकारात्मकतेला सामोरे जावे लागतंय, याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. तिच्याबद्दल बोलला गेलेला प्रत्येक कठोर शब्द आम्हालाही दुखावतोय, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही".
या पत्राच्या शेवटी त्यांनी लिहिले, "आम्ही फक्त एवढीच आशा करतो की माणुसकी आणि दयाळूपणाच जिंकेल. तोपर्यंत, आम्ही आमच्या तान्याच्या पाठीशी प्रेमाने आणि विश्वासाने उभे राहू. आम्ही तुला जसे बनवलं आहेस अगदी तशीच कणखर बॉस बनून राहा".