ठरलं तर! 'या' दिवशी 'बिग बॉस १९' भेटीला येणार, सलमान खान होस्टिंग करणार की नाही? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 10:32 IST2025-05-22T10:30:40+5:302025-05-22T10:32:10+5:30
'बिग बॉस १९'ची सध्या चांगलीच चर्चा असून सलमान खान या सीझनचं होस्टिंग करणार की नाही, याचाही खुलासा झाला आहे

ठरलं तर! 'या' दिवशी 'बिग बॉस १९' भेटीला येणार, सलमान खान होस्टिंग करणार की नाही? जाणून घ्या
टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शोंपैकी एक असलेल्या 'बिग बॉस'च्या १९ व्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. बिग बॉसच्या याआधीचे सर्व सीझन गाजले. इतकंच नव्हे तर बिग बॉस ओटीटीची सुद्धा चांगलीच चर्चा झाली. आता 'बिग बॉस १९'चं (bigg boss 19) बिगुल वाजलं असून सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, सलमान खान (salman khan) या नवीन सीझनचं होस्टिंग करणार की नाही? याशिवाय 'बिग बॉस १९' सुरु कधी होणार? जाणून घ्या
सलमान खान 'बिग बॉस १९'चं होस्टिंग करणार का?
मीडिया रिपोर्टनुसार बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे भाईजानच्या फॅन्सना चांगलाच आनंद झाला आहे. सलमान खान पुन्हा एकदा त्याच्या दबंग स्टाईलमध्ये 'बिग बॉस १९'चं सूत्रसंचालन सांभाळणार आहे. काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस १९' शोच्या भविष्यासंदर्भात काहीशी अनिश्चितता होती, कारण प्रॉडक्शन हाऊस आणि कलर्स टीव्ही यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, आता एंडेमोल शाइन इंडिया या नवीन प्रोडक्शन हाऊसने शोची जबाबदारी स्वीकारली असून 'बिग बॉस १९' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सलमान लवकरच करणार प्रोमो शूट
सलमान खान जूनच्या अखेरीस 'बिग बॉस १९' शोच्या पहिल्या प्रोमोचे शूटिंग करणार असून नवीन सीझनचा ग्रँड प्रीमियर जुलै २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धक म्हणून कोण सहभागी असणार याशिवाय नवीन सीझनची थीम काय असणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खान होस्टिंग करणार म्हणजे 'बिग बॉस १९'ला नवी रंगत निर्माण होईल, यात शंका नाही.