'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट, अखेर सायली अर्जुनसमोर व्यक्त करणार प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:59 IST2025-01-18T09:58:14+5:302025-01-18T09:59:24+5:30
Tharala Tar Mag Serial : 'ठरलं तर मग' मालिका सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुनने सर्वांसमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलीय.

'ठरलं तर मग' मालिकेत मोठा ट्विस्ट, अखेर सायली अर्जुनसमोर व्यक्त करणार प्रेम
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag). या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. परिस्थितीमुळे केलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे रुपांतर कधी प्रेमात झाले हे सायली आणि अर्जुनलाही कळलं नाही. अलिकडेच अर्जुनने सायलीवर प्रेम व्यक्त केले. मात्र सायलीच्या डोळ्यात दिसत असलं तरी तिने प्रेम व्यक्त केले नव्हते. अखेर ती वेळ आली आहे. आता सायलीदेखील अर्जुनवरील प्रेम व्यक्त करताना दिसणार आहे.
ठरलं तर मग मालिका सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुनने सर्वांसमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलीय. मात्र मधुभाऊंना दिलेल्या वचनाखातर सायली आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकली नाही. मात्र ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता आलाय. सायली अर्जुनसमोर तिच्या मनातील प्रेम व्यक्त करणार आहे. मालिकेतले हे सर्वात मोठे वळण आहे.
दरम्यान नवीन प्रोमो समोर आला आहे, त्यात पाहायला मिळत आहे की, सायली राहत असलेल्या चाळीत अर्जुन गुंडासोबत मारामारी करतो आहे. तेव्हा सायली काळजीने अहो असा आवाज देते. तिचा आवाज ऐकून अर्जुन तिच्याकडे पाहतो. तितक्यात दोन गुंड अर्जुनला मारतात ते पाहून सायली वाचवायला पुढे जाते. तितक्यात मधुभाऊ तिचा हात पकडून अडवतात. तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ जाऊ दे मला कोर्टात तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी फक्त लढत आलाय. आज माझी वेळ आहे, त्यांच्यासाठी उभे राहण्याची. तितक्यात मागून कोणीतरी अर्जुनच्या डोक्यात मारते आणि तो खाली कोसळतो. तेव्हा सायली मधुभाऊंचा हात सोडून जाते आणि तिच्या प्रेमाची कबुली देते. हे ऐकून अर्जुन उठतो आणि त्याला लढण्यासाठी पुन्हा बळ मिळते. तो मारुन गुंडांना तिथून पळवून लावतो. आता मधुभाऊ त्या दोघांचे प्रेम पाहून अर्जुनला माफ करतील का आणि अशा परिस्थितीत अर्जुन-सायली कसे एकत्र येणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.