'इंद्रायणी' मालिकेत मोठा ट्विस्ट, श्रीकला विरुद्धच्या लढाईत इंदूला मिळणार आनंदीबाईंची साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:02 IST2025-12-12T14:02:12+5:302025-12-12T14:02:47+5:30
Indrayani Serial : 'इंद्रायणी' मालिकेत दिग्रसकर वाड्यात सध्या परिस्थिती धुमसत आहे. अनेक दिवसांपासून श्रीकलाच्या दबाव, राजकारणाला एकटीने सामोरं जात असलेली इंदू अखेर एक निर्णय घेते, जिथे तिचं एकटेपण अधिक ठळकपणे जाणवतं.

'इंद्रायणी' मालिकेत मोठा ट्विस्ट, श्रीकला विरुद्धच्या लढाईत इंदूला मिळणार आनंदीबाईंची साथ
कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत दिग्रसकर वाड्यात सध्या परिस्थिती धुमसत आहे. अनेक दिवसांपासून श्रीकलाच्या दबाव, राजकारणाला एकटीने सामोरं जात असलेली इंदू अखेर एक निर्णय घेते, जिथे तिचं एकटेपण अधिक ठळकपणे जाणवतं. तिच्यावर येणाऱ्या आरोपांची मालिका, घरातील अनिश्चित वातावरण आणि श्रीकलाची वाढती पकड या सगळ्यांमुळे इंदूची लढाई अधिक चढाईची होत चालली होती. पण आता या संघर्षात एक महत्त्वाचा वळण येणार आहे एक असं वळण, जो इंदूची बाजू भक्कम करण्यासाठी पुरेसा आहे.
काही घडामोडींमुळे अशी परिस्थिती येते की श्रीकलाच्या बाजूने अख्खं दिग्रसकर कुटुंब उभं दिसतं आणि इंद्रायणीवर घर सोडून जाण्याची पाळी येते. पण गोष्टीत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. या क्षणी, इंद्रायणीला श्रीकलाविरुद्ध लढाईत साथ देण्यासाठी इंदूशी हातमिळवणी करून आनंदीबाई तिच्यासमोर ठामपणे उभ्या राहणार आहेत. हा क्षण सगळ्यांसाठी आश्चर्याचा ठरणार आहे. आजवर आपण आनंदीबाईंना फक्त इंद्रायणीचा द्वेष करताना पाहिलं आहे, पण जेव्हा ह्याच आनंदीबाई इंद्रायणीची साथ देणार तेव्हा लढा देण्यात अजून उत्साह वाढणार हे नक्कीच.
श्रीकलाचं पितळ उघड पाडू शकतील का?
आनंदीबाईंच्या या निर्णयामुळे वाड्यातलं वातावरण क्षणाक्षणाला तापत चाललं आहे. अनेकांच्या मते, श्रीकलाच्या वाढत्या प्रभावाला पहिल्यांदाच जोरदार विरोध मिळू शकतो. तिच्या खेळांमुळे घरातील अनेकांना गैरसोयीच्या, तणावपूर्ण परिस्थितींना सामोरं जावं लागलं होतं. इंदू तर गेल्या अनेक दिवसांपासून या कटकारस्थानांच्या थेट केंद्रस्थानी होती. मात्र आता, आनंदीबाईंची साथ मिळाल्याने इंदूची स्थिती पूर्णपणे बदळणार का? आणि कशी? हे पाहणे रंजक ठरणार आहे. केवळ भावनिक नाही तर सामाजिक, कौटुंबिक आणि निर्णयक्षम आधार म्हणूनही आनंदीबाईंचे समर्थन प्रचंड महत्त्वाचे आहे. त्यांच्या आगमनाने दिग्रसकर वाड्यातल्या जुन्या–नव्या नात्यांना नवी दिशा मिळू शकते आणि काही लपलेली सत्येही समोर येण्याची दाट शक्यता आहे. त्या दोघी मिळून श्रीकलाचं पितळ उघड पाडू शकतील का? काय असेल दोघींचा प्लॅन? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.