दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर भारती सिंगने केली पहिली पोस्ट, देवाचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:48 IST2025-12-20T11:47:14+5:302025-12-20T11:48:23+5:30
Bharti Singh : टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई झाली आहे.

दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर भारती सिंगने केली पहिली पोस्ट, देवाचे मानले आभार
टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंगने नुकतीच चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. यावेळेस देखील प्रसिद्ध कॉमेडियनने मुलालाच जन्म दिला आहे. १९ डिसेंबरच्या सकाळी भारती आणि हर्षच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. ही बातमी समजताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. दरम्यान आता तिने दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर इंस्टाग्राम स्टोरीवर पहिली पोस्ट शेअर केली आहे.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया १९ डिसेंबर २०२५च्या सकाळी दुसऱ्या मुलाचे पालक बनले. कॉमेडियन भारती यावेळी 'लाफ्टर शेफ्स ३'च्या शूटिंगसाठी जाणार होती. शूटिंगला निघण्यापूर्वीच तिची तब्येत बिघडली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे वयाच्या ४१ व्या वर्षी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. भारती सिंगला आधीच एक मुलगा आहे, ज्याचे नाव त्यांनी 'लक्ष्य' ठेवले आहे. अशा परिस्थितीत तिला दुसऱ्यांदा मुलगी व्हावी अशी मनापासून इच्छा होती. यासाठी तिने गणेशोत्सवात मुलीसाठी नवस केला होता आणि गणपती बाप्पाला १००० लाडूंचा प्रसादही चढवला होता. संपूर्ण गरोदरपणात भारती अनेकदा मुलगी हवी असल्याचे बोलताना दिसली. मात्र, सर्व प्रार्थना आणि नवसानंतरही तिची मुलगी होण्याची इच्छा अपूर्ण राहिली.

मुलाच्या जन्मानंतर भारतीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर गणपती बाप्पाचा फोटो शेअर केला असून हात जोडल्याचा इमोजी शेअर केला आहे. भारतीने केलेल्या या पोस्टवरून हे स्पष्ट होत आहे की, मुलाच्या जन्माबद्दल ती देवाचे आभार मानत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका व्लॉगमध्ये भारतीने सांगितले होते की, तिला 'जेस्टेशनल डायबिटीस'चा त्रास होत असून तिच्या कंबरेतही खूप वेदना होत आहेत.