एक गोला तर दुसरा 'काजू'; डिलिव्हरीच्या ४ दिवसांनंतर भारती सिंग मुलाला पाहून झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:42 IST2025-12-24T09:41:28+5:302025-12-24T09:42:03+5:30
Bharti Singh : भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. भारती सध्या हॉस्पिटलमध्येच असून ४ दिवसांनंतर तिने आपल्या लहानग्याची भेट घेतली.

एक गोला तर दुसरा 'काजू'; डिलिव्हरीच्या ४ दिवसांनंतर भारती सिंग मुलाला पाहून झाली भावुक
कॉमेडियन भारती सिंग सध्या खूप आनंदी आहे. तिने नुकताच दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. भारती अजूनही हॉस्पिटलमध्येच ॲडमिट असून तिथूनच ती तिचे व्लॉग व्हिडिओ बनवत आहे. आता भारती एका नवीन व्हिडीओमध्ये मुलगा काजूबद्दल बोलली आहे आणि त्याला पहिल्यांदा भेटल्यावर तिला कसे वाटले, हे तिने चाहत्यांना सांगितले आहे.
भारती सिंगने डिलिव्हरीनंतरचा आपला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, "मुलाच्या जन्मानंतर आज पहिल्यांदाच जमिनीवर पाऊल ठेवले आहे. जणू काही शत्रूशी युद्ध करून उठले आहे, असे मला वाटतेय." त्यानंतर भारतीने सांगितले की, ती मुलगा काजूला भेटण्यासाठी NICU मध्ये जात आहे. डिलिव्हरीच्या ४ दिवसांनंतर जेव्हा तिने मुलाला पाहिले, तेव्हा ती खूप भावुक झाली. मुलाला भेटल्यानंतर भारती म्हणाली, "काजू आता अगदी व्यवस्थित आहे आणि दूधही पित आहे. त्याचे सर्व रिपोर्ट चांगले आले आहेत आणि लवकरच डॉक्टर्स त्याला माझ्याकडे आणतील." हे बोलताना भारतीच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते.
भारती सिंगने ३ डिसेंबर २०१७ रोजी लेखक हर्ष लिंबाचिया याच्याशी लग्न केले. २०२२ मध्ये भारतीने पहिल्या मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव लक्ष्य आहे. त्याला प्रेमाने सगळे 'गोला' म्हणतात. आता भारती दुसऱ्यांदा मुलाची आई झाली आहे. तिने प्रेमाने मुलाचे नाव 'काजू' ठेवले आहे, मात्र अजून त्याचा चेहरा रिव्हिल केलेला नाही. भारती नुकतीच 'लाफ्टर शेफ' या शोमध्ये होस्ट म्हणून दिसत होती. बाळाच्या जन्मानंतर सध्या तिने कामातून ब्रेक घेतला आहे.