भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:43 IST2025-12-31T11:42:14+5:302025-12-31T11:43:42+5:30
प्रणिता रासम या आपल्या लेकीला घेऊन शूटिंगवरुन परत येत होत्या.

भांडुप बस दुर्घटनेत बालकलाकाराच्या आईचा मृत्यू, १२ वर्षीय लेकीच्या डोळ्यासमोरच घडला अपघात
भांडुपमध्ये एका इल्केट्रिक बसने लोकांना चिरडल्याची घटना घडली.भांडुप पश्चिमेला रात्री १० च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे ज्यात प्रणिता रासम या महिलेचा मृत्यू झाला आहे. मालिकांमध्ये काम करणारी १२ वर्षीय बालकलाकार पूर्वा रासमची ती आई होती. प्रणिता रासम यांना बस अपघातात गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असता त्यांचा उपचारावेळीच मृत्यू झाला.
प्रणिता रासम या आपल्या लेकीला घेऊन शूटिंगवरुन परत येत होत्या. भांडुपला बसच्या रांगेत उभ्या असताना इलेक्ट्रिक बस आली आणि तिने लोकांना अक्षरश: चिरडलं. प्रणिताही बसखाली आल्या. तर त्यांची लेक पूर्वा वाचली. आईसाठी तिचं काळीज तुटत होतं. ती आईला वाचवण्यासाठी धावली. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण होतं. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बेस्ट प्रशासनाविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रणिता रासम या भांडुप पश्चिम साई विहार टेकडीजवळ राहत होत्या. त्यांच्या पश्चात पती, १२ वर्षीय मुलगी पूर्वा आणि ७ वर्षीय मुलगा अथर्व आहे. पूर्वा ही मराठी मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिकांमध्ये दिसते. सोमवारी अंधेरीमध्येच तिचं शूटिंग होतं यासाठी प्रणिता लेकीला घेऊन गेल्या होत्या. शूटिंग संपवून घरी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला ज्यात प्रणिता यांचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू असा डोळ्यांसमोरच पाहिल्याने चिमुकल्या पूर्वाला जबर धक्का बसला आहे.